पालखी सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

आळंदी - आषाढी वारीत माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी देवस्थानने देणगीद्वारे सुमारे २२ लाख रुपये किंमतीचा १२० किलो वजनाचा जर्मन सिल्व्हर पद्धतीचा नक्षीदार चांदीचा आकर्षक रथ बनविला आहे. हा रथ एका भाविकाने देणगीदाखल दिला असून पुण्यातील रमेश मिस्त्री यांनी रथासाठी संपूर्ण कारागिरी केली आहे. दरम्यान उद्या सकाळी दहा वाजता चांदीचा रथ आळंदी देवस्थानला सुपूर्द केला जाणार आहे.

माउलींचा पालखी सोहळा यंदाच्या वर्षी ६ जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. मात्र गेल्या वर्षी रथाबाबत थोडासा वाद निर्माण झाला होता. पुण्यातील लष्कराच्या आरएडी विभागाने बनविलेला चांदीचा रथ परत नेला असल्याने देवस्थानने मागील वर्षी जुनाच रथ वापरला होता. दहा वर्षांपूर्वी देवस्थानने बनविलेला आणखी एक चांदीचा रथ वादात सापडल्याने काही विश्वस्तांना पदमुक्त करण्यात आले होते. अद्याप त्याबाबत वाद न्यायिक स्तरावर आहे. यामुळे देवस्थानने यंदाच्या वर्षी नव्याने रथ बनविण्याची भूमिका घेतली आणि त्यासाठी त्यांना पुण्यातील मावळ भागातील देणगीदार मिळाला. पालखी सोहळ्यासाठी सध्या रथ सज्ज असून पुण्यातील भिलारवाडीतील रमेश मिस्त्री, राजेंद्रभाई मिस्त्री, प्रकाश मिस्त्री यांच्यासह नऊ जणांनी यासाठी नक्षीदार कोरीव काम केले आहे. 

उद्या सकाळी (ता.१८) दहा वाजता आळंदी देवस्थानमध्ये रथाचा अर्पण सोहळा होणार आहे. यासाठी सोहळाप्रमुख ॲड विकास ढगे, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, योगेश देसाई, अजित कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

असा आहे रथ
रथाची लांबी बारा फूट असून रुंदी सहा फूट आणि उंची तेरा फूट आहे. रथाच्या वरच्या बाजूने सोन्याचा मुलामा दिलेले तीन घुमट बसविण्यात आले आहेत. अकरा कळस, दहा महिरपी, आठ खांब आणि त्यावर गरूड आणि मारुतीची मूर्ती कोरण्यात आली आहे. रथाच्या वरच्या बाजूने पावसाचे पाणी जाण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. सुमारे चार महिने रथासाठी कोरिव काम करण्यात आल्याची माहिती रमेश मिस्त्री यांनी दिली.

Web Title: palkhi sohala new rath