संगीतातील द्वैत-अद्वैताचा ‘भीमसेनी’ मिलाफ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची आज (ता. ४) ९८ वी जयंती. त्यानिमित्त त्यांचे पुत्र पं. श्रीनिवास जोशी व शिष्य पं. आनंद भाटे यांनी त्यांच्या आठवणी जागवत पंडितजींनी केलेल्या अमूल्य सांगीतिक योगदानाबद्दल व्यक्त केलेले मनोगत...

बाबांचा साधेपणा वाखाणण्याजोगा - पं. श्रीनिवास जोशी
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या गाण्याचे आणि माणुसकीचे संस्कार बालपणापासून माझ्यावर होत गेले. ‘स्टार पॉवर’ असलेले माझे बाबा सामान्यातील सामान्य श्रोत्यांना साधेपणानं भेटत. अमूक एखाद्या बाबतीत यांना काही काही कळतंय की नाही, असं वाटत असतानाच ते असं एखादं वाक्‍य बोलून जायचे, की त्यातील सखोल तत्त्वज्ञान ऐकणाऱ्याला विचार करायला भाग पडायचं. शास्त्रीय संगीत हा त्यांच्या गाण्याचा मूळ पाया असला; तरी ते कुठं, कसं आणि किती वेळ गायचं, याबद्दल बाबांनी काही आडाखे बांधलेले असायचे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शास्त्रीय संगीत न शिकलेल्यांनाही ते आवडलं पाहिजे, यासाठी ते तसा श्रोतावर्ग समोर असल्याचं लक्षात येताच रंजक करून गायचे. गायक जी. एन. जोशी यांनी एकदा एचएमव्ही कंपनीच्या माध्यमातून बाबांची ‘लाँग प्लेइंग रेकॉर्ड’ काढली. त्यातून ते भारतभर पोचले. एखादा राग सतरा ते अठरा मिनिटांमध्ये परिपूर्णतेनं सादर करणं, हे तेव्हा नवीन होतं. पण, बाबांनी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याच्या दृष्टीनं ते आत्मसात केलं. बाबांनी जास्तीत जास्त संख्येनं एका रात्रीत निर्दोषपणे रेकॉर्डिंग केल्याबद्दल नंतर बोललं जाऊ लागलं. एरवी मोठ्या मैफिलीत एखादा अभंग पस्तीस-चाळीस मिनिटं रंगवणारे बाबा तीन मिनिटांच्या रेकॉर्डिंगसाठी तो आटोपशीरपणे गाताना त्यातील शब्दांकडं जास्त लक्ष द्यायचे.

एकाच वेळी गोड आणि शक्तिमान गाणं, असा विरोधाभास त्यांच्या मांडणीत असायचा. सवाई गंधर्व संगीत महोत्सवातून त्यांच्या प्रेमाखातर अनेक दिग्गज गायले. तोच सन्मान त्यांनी नवोदितांना दिला. बाहेरच्या अनेक संगीत महोत्सवांसाठीही त्यांनी अनेक नवोदितांची नावं सुचवली.

माझ्या बाबांना कसलीही आसक्ती नव्हती. आपण जगद्विख्यात असल्याचा कुठलाही बडेजाव कधी त्यांच्यात दिसला नाही. मंचावर गात असताना संगीतमय झालेले ते आणि मंचावरून खाली उतरताच सर्वांशी साधेपणानं वागणं, हे त्यांच्यातलं द्वैत थक्क करणारं होतं. गाण्यात अत्यंत तल्लीन झालेले, त्यापुढं सभोवतालचं भान हरपणारे पंडित भीमसेन जोशी गातागाताच समोरच्या माणसांची क्षणात नस ओळखून त्यांना आकर्षक वाटेल असं गाणं सादर करायचे, तेही शुद्धता व दर्जाबाबत कुठलीही तडजोड न स्वीकारता. असा द्वैत-अद्वैताचा दुर्मीळ मिलाफ तर्कापलीकडचा होता. पण, तेच वास्तव होतं.

माझ्या जीवनाची दिशाच ठरली - पं. आनंद भाटे
महान गायक पंडित भीमसेन जोशी यांनी मला शिष्य म्हणून माझ्या बालपणी स्वीकारलं आणि माझ्या जीवनाची दिशाच जणू नेमकेपणानं ठरली. मी बालपणी बालगंधर्वांची गाणी खूप गायचो. पंडित भीमसेनजींची पहिली भेट झाली ती हिराबाई बडोदेकर यांच्याकडं. त्यांच्यासारख्या थोर गायिकेकडून मला खूप प्रोत्साहन मिळायचं. त्यांच्याकडं दिग्गज कलावंत आले, की त्यांच्यासमोर त्या मला गायला सांगत. भीमसेनजींचे गुरू जरी सवाई गंधर्व असले, तरी ते बालगंधर्वांनाही गुरुस्थानी मानत. आपल्या गुरूंची गाणी हा नऊ-दहा वर्षांचा छोटा मुलगा गातो, याचं त्यांनी कौतुक केलं. मग म्हणाले, ‘‘नुसताच संगीताचा रियाझ उपयोगाचा नाही. तब्येतही कमावण्याकडे लक्ष दे. व्यायाम कर.’’ मी सतरा वर्षांचा झाल्यावर त्यांनी मला गाणं शिकवावं, अशी विनंती करायला मी त्यांच्या घरी गेलो. ती त्यांनी मान्य केली आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मी इंजिनिअरिंग, ‘एम. टेक.’ करून आयटी क्षेत्रात काम करू लागलो. याचं ते कौतुक करायचे. तेवीस वर्षं त्यांच्याकडून तालीम घेताना त्यांची थोरवी लक्षात यायची. ते कमी शब्दांत अनेकदा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगून जायचे. भीमसेनजींनी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करून इतिहास घडविला. त्या काळात आजच्यासारख्या सुविधा नव्हत्या.

त्या काळी त्यांनी शास्त्रीय संगीत लोकप्रिय केलं. उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत व भक्तिसंगीतही तेवढ्याच उंचीवर नेलं. त्या सगळ्याचा फायदा आज आमच्या पिढीला मिळतो आहे. बंदिस्त मैफिलींपासून ते हजारोंच्या संख्येनं शास्त्रीय संगीत आवडीनं ऐकणारे श्रोते, हे आगळंवेगळं स्थित्यंतर त्यांच्या प्रयत्नांतून घडलं. 

त्यांच्याकडं शिकायच्या एका टप्प्यावर ते म्हणाले, ‘‘आता तू सवाई महोत्सवात गा.’’ तेव्हा माझं वय एकतीस होतं. नंतर आठ वर्षांनी सवाईत गायच्या आधी त्यांना नमस्कार करायला घरी गेलो. त्यांची प्रकृती खालावलेली होती. पण, तुझ्या गाण्याला थोडा वेळ का होईना, पण येईन, असं म्हणाले. प्रत्यक्षात आलेही. हे माझ्यासाठी खूप मोलाचं होतं.

प्रत्येक शिष्याला ते त्याच्या आवाजाच्या जातकुळीनुसार शिकवत. शिष्यांनी गुरूची नक्कल न करता स्वतःचं कमावलेलं गाणं सादर करावं, हे ते प्रकर्षानं सांगत. आज मी त्यांची गायकी माझ्या मनन, चिंतनासह मांडतो. नकळतच त्यांच्या श्रवणस्मृतींशी जोडला जातो. ते ऐकून लोक त्यांची आठवण झाल्याचं सांगतात, तो मला त्यांचाच आशीर्वाद वाटतो. विशेषतः ‘तीर्थ विठ्ठल,’ ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे अभंग गाताना हे हमखास घडतं. अशा वेळी ज्या टाळ्या मला मिळतात, त्या वास्तविक त्यांच्यासाठीच असतात.
(शब्दांकन - नीला शर्मा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandit Bhimsen Joshi Birth Anniversary