स्वरांचे नवे जग निर्माण करतो तो कलाकार - पुरंदरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे - ‘‘वयापेक्षा तपश्‍चर्येवर सारे काही अवलंबून असते. कला समजण्याकरिता रसिकताही असावी लागते. कारण कलेच्या सादरीकरणातून कलाकार स्वरांचे नवे जग निर्माण करत असतो. म्हणूनच कलाकार ही ईश्‍वरी देणगीच आहे,’’ असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. 

बेडेकर गणपती मंदिर, नृत्ययात्री व तालचक्र या संस्थांतर्फे पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. सुरेश तळवलकर, विजय पुसाळकर, प्रवीण कडले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. तत्पूर्वी राकेश चौरसिया यांनी बासरीवादनातून राग पुरिया कल्याण सादर केला. त्यांना पं. विजय घाटे यांनी तबल्यावर साथसंगत केली. माणिक अंबिके यांच्या शिष्या मेघना साबडे व सहकाऱ्यांनी नृत्यातून शिवशक्ती स्तुती सादर केली. 

पं. मंगेशकर म्हणाले, ‘‘१९६६ मध्ये मी ‘मावळत्या दिनकरा’ हे गाणे ध्वनिमुद्रित करीत होतो, तेव्हा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी त्या गाण्यासाठी सुरेल बासरीवादन केले होते. ‘मोगरा फुलला’ या गाण्यासाठीही चौरसिया यांनी ‘गोरखकल्याण’ रागामध्ये बासरी वाजविली होती.’’ पं. तळवलकर म्हणाले, ‘‘कलाकार स्वतःच्या कलेतून स्वतंत्र स्थान निर्माण करीत असतात. पं. हरिप्रसादजींनीदेखील संगीतात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.’’

Web Title: Pandit Hariprasad Chaurasia felicitated at the hands of Babasaheb Purandare