‘पानिपत’चा वाद जिल्हा न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

‘पानिपत’ चित्रपटात मराठ्यांचा इतिहास चुकीचा आणि दिशाभूल करणारा असून, मराठा सरदारांचा उल्लेख केल्याशिवाय ‘पानिपत’चा रणसंग्राम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ‘पानिपत’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका येथील न्यायालयात दाखल झाली आहे.

पुणे - ‘पानिपत’ चित्रपटात मराठ्यांचा इतिहास चुकीचा आणि दिशाभूल करणारा असून, मराठा सरदारांचा उल्लेख केल्याशिवाय ‘पानिपत’चा रणसंग्राम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ‘पानिपत’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका येथील न्यायालयात दाखल झाली आहे.

सरदार महादजी शिंदे यांच्या परिवारातील उत्तमराव शिंदे सरकार यांनी ॲड. आश्‍विन मिसाळ यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. यावर दोन डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, कलाकार व लेखक यांना याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. महाराज ज्योतिरादित्य शिंदे यांचे बंधू राजे इंद्रजित शिंदे (ग्वाल्हेर), मस्तानी साहिबा यांचे आठवे वंशज नवाब शादाब अली बहादूर (भोपाळ) तसेच देशभरातील सरदार घराण्यांनी पाठिंबा दिल्याचे शिंदे सरकार यांनी सांगितले.

चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत आहे. लेखक व दिग्दर्शकांनी सदाशिवराव भाऊ या खोट्या आणि चुकीच्या व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाहीत. मराठा सरदारांचा इतिहास डावलून ‘पानिपत’चा इतिहास होऊच शकत नाही. अशाप्रकारे मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न करून चित्रपट प्रदर्शित करू नये. त्यामुळे सहा डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. चित्रपटात एकाही लढवय्या मराठ्याचे नाव नसून, विशिष्ट समूहाच्या उदात्तीकरणासाठी अस्सल मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panipat Movie Dispute in District Court