पंजाबी- मराठी साहित्यिक एका व्यासपीठावर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

पुणे - पंजाबी भाषा, साहित्य, संगीत, नृत्य, चित्रपट, लोककला, प्रसार माध्यम अशा विविध विषयांवर पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनात चर्चा होणार आहे. त्यासाठी पंजाबी आणि मराठी भाषेतील शंभरहून अधिक साहित्यिक एका व्यासपीठावर येणार आहेत. असा प्रयत्न प्रथमच होत आहे. 

पुणे - पंजाबी भाषा, साहित्य, संगीत, नृत्य, चित्रपट, लोककला, प्रसार माध्यम अशा विविध विषयांवर पहिल्या विश्‍व पंजाबी साहित्य संमेलनात चर्चा होणार आहे. त्यासाठी पंजाबी आणि मराठी भाषेतील शंभरहून अधिक साहित्यिक एका व्यासपीठावर येणार आहेत. असा प्रयत्न प्रथमच होत आहे. 

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सरहद संस्थेतर्फे 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पंजाबी साहित्य संमेलन होणार आहे. सुरजितसिंग पातर यांनी संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सायंकाळी चार वाजता संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांतून पंजाबी संस्कृतीचे दर्शन घडविले जाणार आहे. त्याआधी सकाळी अकरा वाजता "भाषा अनेक-भारत एक' ही ग्रंथदिंडी शहरात निघणार आहे. 

दुसऱ्या दिवसाची (ता. 19) सुरवात पंजाबी संस्कृतीवरील चर्चासत्राने होणार आहे. त्यात एस. एस. विर्क, बाहरी मल्होत्रा, डॉ. विजय सतबीर सिंग, अशोक भरुआ, प्रभज्योत संधू, केतन पाटील सहभागी होणार आहेत. त्यानंतर पंजाबी साहित्यावरील परिसंवादात "सकाळ'चे मुख्य संपादक श्रीराम पवार, उज्जल दोसांज, जगजितसिंग दर्डी या मान्यवरांबरोबरच पंजाबमधील अनेक लेखक-कवी आपली मते मांडणार आहेत. पंजाबी आणि मराठी साहित्यिकांवरील चर्चेत डॉ. सदानंद मोरे, डॉ. सुखदेव सिंग सिरसा, डॉ. पंडित विद्यासागर सहभागी होणार आहेत. मराठी-पंजाबी कवींचे एकत्र कवी संमेलन, कपूर्स डायरी, मान्यवर कवींच्या उपस्थितीत "कवी दरबार'... अशा कार्यक्रमांनी संमेलन रंगणार आहे. 

संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी (ता. 20) नाटककार डॉ. आतमजित सिंग, जतिंदर पन्नू या मान्यवर साहित्यिकांचे विचार श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत. त्यानंतर जम्मू काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अर्थतज्ज्ञ इशर अहलुवालिया, कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेचार वाजता संमेलनाचा समारोप सोहळा होणार आहे. 

धर्मेंद्र यांना "पंजाबी गौरव' 

संमेलनात अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पंजाबी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जसपाल सिंग, उज्जल दोसांज, डॉ. एस. पी. ओबेरॉय, एस. तरलोचन सिंग, राजी शिंदे, डॉ. केवल धीर, सतनाम मानक, चरणजित कौर नंदा, संत बलबीर सिंग सिचेवाल यांना "विश्‍व पंजाबी गौरव' पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या वेळी लस्सी टेबल बुक आणि स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे.

Web Title: Panjabi Marathi literary one platform