‘पेपरफुटी’च्या नुकसानाची वसुली होणार

Savitribai-Phule-Pune-University
Savitribai-Phule-Pune-University

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या पेपरफुटी प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका असलेले परीक्षा संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्याकडून फेरपरीक्षेचा खर्च वसूल केला जाणार आहे.

गेल्या आठवड्यात १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा होती. मात्र, परीक्षा विभागाने त्याच्या प्रश्नपत्रिका पेपर होण्यापूर्वीच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या होत्या. 

या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. त्यात चव्हाण यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांकडून समजते.

विद्यापीठाने ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा विभागाच्या चुकीमुळे आधी झालेल्या परीक्षेचा खर्च पाण्यात गेला आहे. नव्या विद्यापीठ कायद्यात नुकसानीस जबाबदार व्यक्ती वा अधिकाऱ्याकडून ती रक्कम वसूल करण्याची तरतूद आहे. विद्यापीठाने या तरतुदीनुसार चव्हाण यांच्याकडून नुकसानभरपाई करून घेण्याचे, तसेच फेरपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यापासूनचा सर्व खर्च वसूल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचा निर्णय बुधवारी (ता.२७) होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

संघटना आक्रमक
पेपरफुटीमुळे विद्यापीठाची बदनामी होण्याबरोबर विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटनेने डॉ. अशोक चव्हाण यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. त्यासाठी परीक्षा मंडळाच्या बैठकी वेळी आंदोलन करण्याचा इशारा ‘अभाविप’चे विकास खंडागळे आणि ‘राष्ट्रवादी’चे ऋषी परदेशी यांनी दिला आहे.

विधी अभ्यासक्रमाच्या पेपरफुटी प्रकरणी परीक्षा नियंत्रक यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. या प्रकाराबद्दल जबाबदारी निश्‍चित करून कारवाई करण्यासंबंधी बुधवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. 
- डॉ. एस. एन. उमराणी (प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com