पुण्यात साकारतेय ‘पेपरलेस’ कार्यालय

शिवाजी आतकरी
शुक्रवार, 31 मार्च 2017

पिंपरी - एखाद्या यंत्रणेने ठरविल्यास कामाची पारंपरिक पद्धत बदलता येते. त्यासाठी हवी फक्त प्रबळ इच्छाशक्ती आणि कामाची आवड. याच आधारावर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘पेपरलेस’ कार्यालयाची संकल्पना पुण्यात साकार होत आहे. देशात पथदर्शी ठरू शकणारी संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या 
दूरदृष्टीने आकार घेत असून, काम अंतिम टप्प्यात आहे. 

पिंपरी - एखाद्या यंत्रणेने ठरविल्यास कामाची पारंपरिक पद्धत बदलता येते. त्यासाठी हवी फक्त प्रबळ इच्छाशक्ती आणि कामाची आवड. याच आधारावर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘पेपरलेस’ कार्यालयाची संकल्पना पुण्यात साकार होत आहे. देशात पथदर्शी ठरू शकणारी संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या 
दूरदृष्टीने आकार घेत असून, काम अंतिम टप्प्यात आहे. 

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे  देशातील अशा प्रकारचे पहिले कार्यालय होणार आहे. या कार्यालयातील सर्व कामे ऑनलाइन होणार आहेत. फाइल दाखल करण्यापासून ते अंतिम सही होऊन बाहेर पडेपर्यंत. ही सर्व कामे संगणक आणि इंटरनेटच्या मदतीने होणार आहेत. इथे सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करायची आहेत. त्यासाठी काळ, वेळेचे बंधन नाही. आवश्‍यक परवानगीसाठी महिन्याचे सर्व दिवस आणि २४ तासांत केव्हाही कोठूनही आपली फाइल संबंधित खातेदार दाखल करू शकतो. तसेच आपल्या फाइलचा कार्यालयीन प्रवास, त्यातील त्रुटी तो पाहू शकतो. कोठूनही फायलींमधील त्रुटींची पूर्तता ऑनलाइन करू शकतो. त्यामुळे कार्यालयात जाणे, अधिकाऱ्यांसाठी ताटकळत बसणे, पैशांचा अपव्यय, दप्तर दिरंगाई आणि एजंटांपासून सुटका होणार आहे. 

यासाठी पीएमआरडीएने सात हजार चौरस किलोमीटर कार्यक्षेत्राचे हवाई स्कॅन करून घेतले आहे. अगदी पाच सेंटिमीटरपर्यंत बिनचूक हे स्कॅन करण्यात आले आहे. जागा, जमिनीतील बांध, जमिनीची मालकी हक्क, रस्ते, चढ-उतार, बंधारे, पाण्याची ठिकाणे, जवळील रेल्वेमार्ग, वीजपुरवठा, हमरस्ते इत्यादींसोबत तेथील पर्जन्यमान, उन्हाची तीव्रता, वाऱ्याचा 
वेग इत्यादींबाबत अतिसूक्ष्म माहिती संकलित केली आहे. 

या माहितीच्या आधारावर हे कार्यालय काम करणार आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन टपाल फाइल, सक्षम अधिकाऱ्याची सहीसुद्धा ऑनलाइन यंत्रणेतून येणार आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार असून, निविदा काढून एजन्सी नेमण्याचे बाकी आहे.

पीएमआरडीए मुख्यत्वे बांधकाम परवानगी देते. या प्रक्रियेतील स्थळ पाहणी, कागदपत्रांची पुनर्पाहणी, स्थळ पाहणी अहवाल, टॅक्‍स तसेच परवानगी मागणारा आणि प्राधिकरण कार्यालयात यामुळे सुसूत्रता येणार असून, एका संगणकाच्या विंडोत एका क्‍लिकवर हे कार्यालय येणार आहे.

आमच्या माहितीचा उपयोग इतर कार्यालयांनासुद्धा होणार आहे. प्रत्येक वेळी सरकार निर्णय घेईल, याची वाट का पाहायची. यंत्रणेने वेगळ्या धाटणीचा विचार करून कामात वेगळेपण आणले आहे. तसेच पारदर्शक व जलद कामाची खात्री या कार्यालयामुळे मिळणार आहे.
- महेश झगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए

Web Title: paperless office in pune