लसीबाबत पालकांची दिशाभूल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे - आपण ‘एमएमआर’च्या लसीचे तीन डोस देत आहोत, त्यामुळे सरकारतर्फे लहान मुलांना देण्यात येणारी गोवर आणि रुबेला (एमआर) लस देण्याची गरज नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती शहरातील काही बालरोगतज्ज्ञ पालकांना देत असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘एमआर’ लसीकरण मोहीम सुरू असेपर्यंत बालरोगतज्ज्ञांनी ‘एमएमआर’ची लस देऊ नये, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने केले आहे. 

पुणे - आपण ‘एमएमआर’च्या लसीचे तीन डोस देत आहोत, त्यामुळे सरकारतर्फे लहान मुलांना देण्यात येणारी गोवर आणि रुबेला (एमआर) लस देण्याची गरज नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती शहरातील काही बालरोगतज्ज्ञ पालकांना देत असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘एमआर’ लसीकरण मोहीम सुरू असेपर्यंत बालरोगतज्ज्ञांनी ‘एमएमआर’ची लस देऊ नये, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने केले आहे. 

राज्यात २७ नोव्हेंबरपासून एक महिना ते पंधरा वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलाला गोवर आणि रुबेलाप्रतिबंधक लस देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या दरम्यान बालरोगतज्ज्ञांनी त्यांच्या दवाखान्यात देण्यात येणारी ‘एमएमआर’ ही लस देऊ नये. ही मोहीम संपल्यानंतर ती पूर्ववत द्यावी. ‘एमआर’ आणि ‘एमएमआर’ या दोन्ही लसींमध्ये किमान एक महिन्याचे अंतर असण्याच्या दृष्टीने बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने हे आवाहन केले आहे. मात्र, शहरातील काही खासगी डॉक्‍टर या आवाहनाला हरताळ फासत सर्रास बालकांना ‘एमएमआर’ची लस देत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात ही लस घेणे योग्य नाही, त्यावर माहिती नाही, अशी मुक्ताफळेही उधळत आहेत. ‘इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय ललवाणी म्हणाले, ‘‘‘एमआर’ आणि ‘एमएमआर’ हे दोन्ही ‘लाइव्ह व्हायरस’ आहेत, त्यामुळे या दोन्ही लसीकरणात एक महिन्याचे अंतर निश्‍चित केले आहे, त्यामुळे ‘एमएमआर’ची लस घेतल्याच्या दिवसापासून एक महिन्याने पालकांनी आपल्या मुलाला ‘एमआर’ची लस द्यावी.’’

‘एमआर’ला प्राधान्य द्या
काही खासगी बालरोगतज्ज्ञ ‘एमएमआर’ लस देतात. ही लस घेण्याचे प्रमाण पाच ते दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नाही, त्यामुळे देशातील शंभर टक्के बालकांना गोवर आणि रुबेला ही लस देण्यात येत आहे. या लसीकरणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन 
सार्वजनिक आरोग्य विभागाने पालकांना केले आहे.

काही बालरोगतज्ज्ञ लसीकरणाबाबत दिशाभूल करणारी माहिती देत असल्याच्या घटना कानावर आल्या आहेत. बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने या मोहिमेला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. पालिकेने याबाबत ०२०-२४४८७७०० या दूरध्वनी क्रमांकावर ‘हेल्पलाइन’ सुरू केली आहे.
- डॉ. रामचंद्र हंकारे, प्रमुख, आरोग्य विभाग, महापालिका

Web Title: Parents are misguided about MR vaccines