सीबीएसईनेही परीक्षा रद्द कराव्यात; पालकांची मागणी

सीबीएसईनेही परीक्षा रद्द कराव्यात; पालकांची मागणी

पुणे  - शालेय शिक्षण विभागाने राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांच्या पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या, तरी आयसीएसई आणि सीबीएसईशी संलग्न शाळांच्या परीक्षा अद्याप रद्द करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पालक धास्तावले असून, परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याची मागणी केली आहे. 

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांना गर्दीपासून दूर ठेवण्याचे उपाय सरकार योजत आहे. त्यासाठी शाळा महाविद्यालयांना सुटी देण्याबरोबर आता परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविले जाणार आहे. यामुळे एप्रिलमध्ये परीक्षा होणार का, हा प्रश्‍न आता राज्य सरकारने निकाली काढला आहे. परंतु आयसीएसई आणि सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांनी परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

सीबीएसईच्या पुण्यातील काही शाळा या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत आल्या आहेत; परंतु याबाबत त्यांच्या मंडळाकडून काही सूचना येतात का, याची प्रतीक्षा केली जात आहे. काही शाळांच्या परीक्षादेखील संपल्या आहेत, त्यामुळे या शाळांनी विद्यार्थ्यांना सुटी दिली आहे. परंतु सीबीएसईच्या बहुतांश शाळांनी पहिली ते आठवीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

केंद्रीय विद्यालयेदेखील सीबीएसईशी संलग्न आहेत. या शाळांच्या पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्यामुळे या मंडळाशी संलग्न इतर शाळांनीदेखील परीक्षा रद्द कराव्यात, अशी पालकांची मागणी आहे. कोरोनाचा प्रसार हा एप्रिल महिन्यापर्यंत आटोक्‍यात येणे शक्‍य होणार नाही, अशी पालकांना चिंता आहे. त्यामुळे या काळातही मुलांवर परीक्षेचे ओझे टाकू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. 

मुख्यमंत्र्यांना पत्र 
इंडिया वाइड पेरेंट असोसिएशनने यासंबंधी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले असून, सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांच्या परीक्षा रद्द कराव्यात. तसेच, पहिली ते आठवी, नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवावे, असे त्यात म्हटले आहे. कोरोनामुळे प्रत्येक नागरिक चिंतेत आहे. अशा काळात विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण नको, त्यामुळे परीक्षा रद्द करावी, असे या संघटनेच्या अध्यक्ष अनुभा सहाय यांनी म्हटले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com