पिंपरी शहरात लवकरच पार्किंग धोरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पिंपरी - पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये पार्किंग धोरण आणण्यात येत असून, त्यासाठी आता शहरातील गर्दीची चौदा ठिकाणे निवडण्यात आली आहेत. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांकडून शुल्क वसूल केले जाईल. महापालिकेच्या एप्रिलमधील सर्वसाधारण सभेत हे धोरण मांडण्यात येणार आहे. 

पिंपरी - पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये पार्किंग धोरण आणण्यात येत असून, त्यासाठी आता शहरातील गर्दीची चौदा ठिकाणे निवडण्यात आली आहेत. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांकडून शुल्क वसूल केले जाईल. महापालिकेच्या एप्रिलमधील सर्वसाधारण सभेत हे धोरण मांडण्यात येणार आहे. 

महापालिकेतील पदाधिकारी, राजकीय पक्षांचे गटनेते, विविध विषय समित्यांचे अध्यक्ष यांची बैठक घेऊन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी सर्वांना या धोरणाबाबत सविस्तर माहिती दिली. शहरातील गावठाणाचा भाग, झोपडपट्टी वस्ती येथे सध्या हे धोरण लागू करण्यात येणार नाही. परंतु, पुढील दोन वर्षे त्याचा अभ्यास करून आवश्‍यकतेनुसार या भागासाठी धोरण ठरविले जाईल. 

महापालिकेची लोकसंख्या 2001 पासून 2017 पर्यंत 10.64 लाखांवरून 21 लाखांपर्यंत पोचली. याच काळात एकूण वाहनांची संख्या 2.10 लाखांवरून 15.68 लाखांवर पोचली. त्यामध्ये दुचाकी वाहने 11.69 लाख, तर चारचाकी वाहने 2.54 लाख आहेत. म्हणजेच 21 लाख लोकांकडे 16 लाख वाहने असल्यामुळे पार्किंगची समस्या जाणवू लागली. दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई, बंगळूर, नागपूर या मोठ्या शहरांमध्ये पार्किंग धोरण आखून सार्वजनिक पार्किंगच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी दर आकारणी करण्यास सुरवात केल्याचे प्रशासनातर्फे या बैठकीत सांगण्यात आले. 

या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अत्याधुनिक पार्किंग तंत्रज्ञानाचा वापर करून पार्किंग ऍप तयार करण्यात येईल. त्याद्वारे वाहनतळावर नियंत्रण ठेवण्यात येईल. सार्वजनिक वाहनतळ धोरण सुरू करून प्रभाग कार्यालयामार्फत पार्किंग शुल्कवसुलीसाठी प्रत्येक भागात ठेकेदाराची नेमणूक करण्यात येईल. पार्किंग करावयाचे रस्ते आणि शुल्क याबाबत दर दोन वर्षांनी आढावा घेऊन त्यात बदल करण्यात येतील. विकास आराखड्यातील वाहनतळांची आरक्षणे विकसित करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात महापालिकेने ठरविले आहे. 

धोरण ठरविण्यासाठी पार्किंगच्या मागणीनुसार चार झोन करण्यात आले. त्यानुसार त्यांचे दर निश्‍चित करण्यात आले. त्या झोननुसार जेथे 40 ते 60 टक्के पार्किंगची मागणी आहे, तेथे "सी' झोन असेल. त्या झोनचे निश्‍चित केलेले दर पहिल्या वर्षी निवडलेल्या रस्त्यांवर लागू केले जातील. वर्षांनंतर पार्किंगची मागणी किती त्याची माहिती संकलित होईल, त्या आधारे त्यांचे चार झोन ठरविले जातील. रात्री निवासी पार्किंगसाठी रात्री अकरा ते सकाळी आठ या वेळेसाठी रोज 25 रुपये याप्रमाणे वार्षिक परवाना नऊ हजार 325 रुपयांचा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. 

निवासी भाग, गावठाणात शुल्क आकारणार नाही. वाहतुकीची कोंडी, गर्दीच्या ठिकाणी शुल्क घेतले जाईल. उत्पन्न मिळविण्याचा उद्देश नसून, मिळालेली रक्कम वाहतूक सुविधेसाठी वापरली जाईल. पार्किंग धोरणासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी बैठकीत सहमती दर्शविली आहे. सर्वसाधारण सभेत शुल्क ठरवू. 
- एकनाथ पवार, सभागृह नेते, महापालिका. 

प्रस्तावित पार्किंगची ठिकाणे 
- सर्व बीआरटी रस्ते, पिंपरी (कॅंप) 
- भोसरी गाव, नाशिक फाटा उड्डाण पूल, तसेच चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, आकुर्डी येथील रेल्वे स्थानक परिसर. 
- देहू-आळंदी रस्ता, प्राधिकरण क्षेत्र. 
- भुमकर चौक ते केएसबी चौक रस्ता 
(पार्किंग शुल्क ठरविलेल्या रस्त्यालगतच्या सर्व रस्त्यांसाठी मुख्य रस्त्यापासून दोनशे मीटरपर्यंत पार्किंग धोरण लागू राहील.) 

प्रस्तावित पार्किंगचे दर (रुपयांत प्रतितास) 
वाहन - दर 
दुचाकी - 2 
रिक्षा - 6 
चार चाकी - 10 
टेंपो - 10 
मिनी बस - 15 
ट्रक - 33 
खासगी बस - 39 
(सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षाथांबे यांना शुल्कातून सवलत राहील.) 

Web Title: Parking policy soon in Pimpri city