संसदेचे कामकाज सुरळीत चालवावे : शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

पुणे : ''सत्ताधारी पक्षाने संसदीय कार्यपद्धती आणि तत्त्वे जतन करण्याची गरज आहे. संसदेचे कामकाज सुरळीत कसे चालेल, ही जबाबदारी जपणे अधिक आवश्‍यक आहे. विरोधक विविध विषयांवर आपला विरोधी स्वर लावत असले, तरीही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी त्यांनी विसरून चालायची नाही. आज माझ्या 50 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत मी कधीही कुठल्याही गोंधळात सहभागी झालो नाही. सभागृहात मी माझी सीट कधीही सुटू दिली नाही,'' अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सध्याच्या काळातील संसदीय कार्यपद्धतीवर भाष्य केले.

शिवाय, संसदेत गोंधळ निर्माण होऊ नये, त्यातून नागरिकांना चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. नव्या पिढीत लोकशाही कशी रुजेल, याची काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी नमूद केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थेचे माजी विद्यार्थी असणारे पवार आणि खासदार अमर साबळे यांचा सत्कार शनिवारी करण्यात आला. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे उपस्थित होते. 
आपल्या आठवणी सांगताना पवार म्हणाले, ''एखादा परिसर कालपरत्वे बदलतोच; पण तिथला माणूस बदलण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे असते. त्या-त्या परिसरातील गुणात्मक बदलांमध्ये तिथल्या शैक्षणिक संस्थांचे योगदान अतिशय मोलाचे ठरते. बारामतीसारख्या गावाच्या गुणात्मक विकासात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरले. या संस्थेतील अखंड ऊर्मी अंगी असणाऱ्या आणि ज्ञानसाधनेत गुंतलेल्या अनेक शिक्षकांचा आमच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे.'' 

महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होता येणे ही आपल्या आयुष्यातील जमेची बाजू असली, तरी ते पद तेवढेच आव्हानांचेही असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले. आपल्या कारकिर्दीत घडलेल्या भीषण भूकंपानंतर लातूर पुनश्‍च उभे करणे किंवा प्रचंड मनुष्यहानी घडवणारे बॉंबस्फोट झालेल्या मुंबईने दोनच दिवसांत आपले व्यवहार खंबीर मनाने पूर्वपदावर आणणे, हे आव्हानात्मक प्रसंगही आपल्यापुढे आले, असे ते म्हणाले. 

...अशी मिळाली सैन्यात मुलींना संधी 
पवार म्हणाले, ''मी संरक्षण मंत्री असण्याच्या काळात देशाच्या सैन्यात मुलींना प्रवेश मिळू शकला, याचा मनस्वी आनंद आहे. जगात अनेक मोठ्या देशांत सैन्याच्या विविध शाखांत मुलींना संधी उपलब्ध असताना आपल्याकडे मात्र ती नव्हती. त्यासाठी अनुकूल वातावरणही नव्हते. पण हा बदल घडावा, म्हणून मी मुलींच्या प्रवेशाचा निर्णय घेतला. आज जेव्हा 26 जानेवारीस दिल्ली येथे सैन्यदलाच्या संचलनाची प्रमुख एक मुलगी होते, तेव्हा भारतीय म्हणून माझे ऊर अभिमानाने भरून येते !'' 

शाळेसाठी 25 लाख ! 
या कार्यक्रमात अमर साबळे यांनी बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेसाठी आपल्या खासदार निधीतून 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. या वेळी ते म्हणाले, ''अलीकडच्या काळात पारंपरिक शिक्षण कालबाह्य होत चालले आहे. त्याऐवजी आज सर्वच क्षेत्रांत कौशल्याभिमुख आणि संशोधनाधारित शिक्षण देण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. आज शिक्षणात नवनवे प्रयोग व्हायला हवेत. तसेच, या सोबतच मूल्यशिक्षणाची जपणूकही व्हायला हवी.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com