लाल चोचीच्या पोपटाचे दर्शनही झाले दुर्मिळ

गणेश बोरुडे
सोमवार, 18 जून 2018

तळेगाव स्टेशन (पुणे) : वाढत्या शहरीकरणाच्या ओघात विरळ होत चाललेल्या वनराईतील डेरेदार वृक्ष नष्ट झाल्याने पोपटांचे आसरे नाहीसे झाले. परिणामी लाल चोचीच्या गावरान पोपटाचे मिठू मिठू आणि त्याचे मनोहारी दर्शन अलीकडच्या काळात दुरापास्त झाल्याचे चित्र आहे. झपाट्याने होणाऱ्या नैसर्गिक बदलांचे हे द्योतक पक्षीमित्रांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

तळेगाव स्टेशन (पुणे) : वाढत्या शहरीकरणाच्या ओघात विरळ होत चाललेल्या वनराईतील डेरेदार वृक्ष नष्ट झाल्याने पोपटांचे आसरे नाहीसे झाले. परिणामी लाल चोचीच्या गावरान पोपटाचे मिठू मिठू आणि त्याचे मनोहारी दर्शन अलीकडच्या काळात दुरापास्त झाल्याचे चित्र आहे. झपाट्याने होणाऱ्या नैसर्गिक बदलांचे हे द्योतक पक्षीमित्रांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

रुबाबदार आकार, आकर्षक रंगसंगती, बोलण्याच्या वैशिष्टय़ांमुळे पोपट उर्फ राघू निसर्ग आणि मनुष्यजीवनात महत्वाचे स्थान टिकवून होता. अगदी गाण्यांसोबतच म्हणींमध्येही पोपटाचा उल्लेख आढळतो. डेरेदार झाडाच्या बुंध्यावरील डोलीत, घरांच्या भिंतीमधील फटींमध्ये पोपट घरटी करत. मात्र शहरीकरण आणि स्वतःच्या सोयीसाठी विस्तीर्ण वृक्षांची झालेली बेसुमर कत्तल पोपटांना बेघर करुन गेली. बोलायला शिकतो, पिकाची आणि फळांची नासाडी करणारा म्हणून गैरसमजातून पोपटांची बेसुमार हत्या झाल्यामुळे पोपटांच्या कित्येक जाती कालौघात नामशेष झाल्या. याबरोबरच पोपटांचे खाद्य असलेल्या फळबागांवर कीटकनाशकांचा अंमल वाढल्याने अन्नाच्या दुर्भिक्ष्यामुळे देखील पोपटांची प्रजात कमी झाली.

परिणामी शेतातील विजेच्या तारांवर रांगेत बसणारे अथवा शौकासाठी पिंजर्‍यात बंद करुन ठेवलेले पोपट अचानक कधी गायब झाले हे कालौघात कुणाच्याही ध्यानी आल्याचे दिसत नाही.गावकुसाच्या विरळ जंगलांत,शेतांबरोबरच घरासमोरील तारेवर सहजसहजी नेहमी दृष्टीस पडणाऱ्या पोपट शोधण्यासाठी आता थेट जंगलात जाण्याची वेळ आली आहे. तळेगावासारख्या निसर्गाच्या सानिध्यातील गावात देखील पोपट दिसेनासा झाल्याचे चित्र आहे.पणन महामंडळाच्या शासकीय धान्य गोदामांच्या जुन्या इमारतींच्या आवारात काही पोपट अधूनमधून दृष्टीस पडत असले तरी त्यांचे संवर्धन,प्रजनन आणि संगोपनासाठी पक्षीमित्रांच्या पुढाकाराने कसोशीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.एकंदरीतच पोपटांना वाचवण्याच्या उपायांकडे आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या गरजेकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.अन्यथा पोपट इतिहास जमा होऊन गाणी,म्हणी आणि पुस्तकांपुरताच उरेल यात शंका नाही.

पोपट दुर्मिळ होण्याची कारणे -
- वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषण 
- जंगलतोडीमुळे आश्रयस्थाने उध्वस्त
- अवैध शिकार आणि तस्करी
- कमी होत चाललेल्या खुल्या फळबागा
- फळांवर कीटकनाशकांचा वापर 

पक्षीसंवर्धनासाठी उपाययोजना

१) निसर्ग शिक्षणाची गरज 
2) पोपट संवर्धनाच्या मोहिमा राबविल्या पाहिजेत 
३) वन्यजीव संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी
४) तस्कर आणि शिकाऱ्यांना कडक शासन
५) फळबागांसाठी सेंद्रीय पध्दतीचा वापर
६) डेरेदार विस्तीर्ण वृक्षांचे जतन

"दुर्मिळ होत चाललेला पोपट निसर्गाचा अविभाज्य घटक आहे.पोपट फळांवर अवलंबून असल्यामुळे त्याच्या विष्ठेतुन फळांच्या बिया नैसर्गिकरीत्या इतरत्र पसरविल्या जातात.यातूनच नवीन निसर्गाची उत्पत्ती या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होते.पक्षी टिकला तर निसर्ग टिकेल.निसर्गचक्र अविरतपणे सुरु राहण्यासाठी पक्षी संवर्धनासाठी पावले उचलायला हवीत."
- रोहीत नागलगाव (पक्षीनिरीक्षक, फ्रेंड्स ऑफ नेचर)

Web Title: parrot with red beak is getting rare