मुले वर्गात असताना कोसळला भिंतीचा भाग पण...

अमर परदेशी
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पाटस (ता. दौंड) येथील तामखडा जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (ता. 4) सकाळी अकराच्या सुमारास वर्ग सुरू असताना भिंतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने मुले दुसऱ्या भिंतीच्या बाजूला बसली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पाटस (पुणे) : पाटस (ता. दौंड) येथील तामखडा जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (ता. 4) सकाळी अकराच्या सुमारास वर्ग सुरू असताना भिंतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने मुले दुसऱ्या भिंतीच्या बाजूला बसली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

याठिकाणी अंगणवाडीपासून चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मागील काही वर्षांपासून या शाळेच्या जुन्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. भिंतींना मोठ्या आकाराच्या चिरा पडल्या आहेत. जिल्हा परिषद सदस्या सारिका पानसरे यांच्या माध्यमातून शाळेच्या दुरुस्तीसाठी पाच लाख रुपयांचा निधी काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप शाळेची दुरुस्ती रखडली आहे. अंगणवाडीसाठी तर इमारतीची सोयच नसल्याने चिमुकल्यांना अंगणात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.

बुधवारी शाळा भरल्यानंतर भिंतींच्या छतावरील दगडांचा काही भाग वर्गात कोसळला. भले मोठे दगड समोर पडून मोठा आवाज झाल्याने शिक्षक व विद्यार्थी जीव मुठीत धरून वर्गाच्या बाहेर धावले. बाकांवर मोठे दगड पडले. घटनेनंतर पालकांनी शाळेत धाव घेतली. जिल्हा परिषदेकडून निधी येऊनदेखील दुरुस्ती का होत नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला.
दुपारी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली. केंद्रप्रमुख दिलीप वनवे म्हणाले, शाळेच्या दुरुस्तीसंदर्भात आम्ही पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे मागणी करीत आहे. पैसे मंजूर होऊन देखील केवळ निविदेची प्रक्रिया झाली नसल्याने दुरुस्ती रखडली आहे.

शाळेच्या दुरुस्तीसाठी काही महिन्यांपूर्वीच निधी आला आहे. मात्र, दुरुस्ती झालेली नाही. शाळेच्या दुरवस्थेमुळे मुलांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास शाळा बंद ठेवावी लागेल.
- अमोल भागवत, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती

शाळेच्या दुरुस्तीसाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, शालेय व्यवस्थापन समिती, प्रशासनाचे जबाबदार अधिकारी, शिक्षकांनी दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला पाहिजे.
- सारिका पानसरे, जिल्हा परिषद सदस्य

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Part Of School Wall Collapse In Daund Tehesil