पार्थ पवारांच्या ड्रायव्हरचे अपहरण; सुप्यात सोडले बेशुद्धावस्थेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करून त्याला (सुपा ता. पारनेर, जि. नगर ) येथे बेशुद्धावस्थेत  सोडून देण्यात आले.

शिक्रापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करून त्याला (सुपा ता. पारनेर, जि. नगर ) येथे बेशुद्धावस्थेत  सोडून देण्यात आले.

अपहरणकर्त्यांनी 'तू पार्थ पवारांचा ड्रायव्हर का,' असे विचारून अपहरण केल्याने कुलाबा (मुंबई) व शिक्रापूर (जि. पुणे) पोलीसही चक्रावले आहेत. याबाबत चालक मनोज ज्योतीराम सातपुते ( वय २६, रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे ) याने फिर्याद दिली आहे.

त्याने दिलेल्या माहितीनुसार ५  जुलै रोजी  रात्री ८ वाजता मुंबईत कुलाबा बेस्ट डेपोजवळ उभा असताना एक लाल रंगाची ओमनी गाडी सातपुते यांच्याजवळ आली व तू पार्थ पवारांच्या गाडीचा चालक आहेस का? आम्हाला त्यांना भेटायचे आहे. त्यांचा पत्ता आम्हाला सापडत नाही. त्यांना एक वस्तू द्यायची आहे, असे म्हणून त्याला गाडीच्या पुढच्या सिटवर बसविले. या वेळी गाडीत पाठीमागच्या बाजूला एकजण बसलेला होता. त्याच्याशी माझे काहीच बोलणे झाले नाही. गाडी कुलाबा सर्कल येइपर्यंतचे मला आठवत आहे. मात्र त्यानंतरचे मला काही आठवत नाही. दुसऱ्या दिवशी सहा जुलै रोजी सकाळी आठ वाजता सुपे (ता. पारनेर, जि. नगर) येथे मी रस्त्याच्या कडेला पडल्याचे माझ्या लक्षात आले, असे त्यांनी जबाबात सांगितले आहे.

पाचपुते यांचा मोबाईलही हाळ झाला. ते एसटी बसने सणसवाडी येथे येवून खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातांवर अपहरण आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास कुलाबा पोलीसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parth Pawar's driver abducted in Mumbai