पक्षावरच ठरते उमेदवाराचे महत्त्व

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष

राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष
पुणे - एखाद्या उमेदवाराच्या कामापेक्षा मतदारांसाठी अनेकदा त्याचा पक्ष महत्त्वाचा ठरतो... उमेदवार नवखा असला, तरीही त्याची शैक्षणिक पात्रता ही मतदारांसाठी निर्णायक मुद्दा ठरू शकतो... अनेकदा पक्षांचे आणि उमेदवारांचे महत्त्व हे त्या पक्षाच्या "फेस व्हॅल्यू'वरून ठरवले जाते; अशा वेळी मतदार इतर कोणतेही निकष लावण्याच्या फंदात पडत नाहीत... मतदान या संकल्पनेविषयी मतदारांमध्ये अजूनही पुरेशी जागृती दिसून येत नाही... अशी अनेक निरीक्षणं यंदाच्या महापालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आली. विशेष म्हणजे, राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन हे सर्वेक्षण केले होते.

सध्याची तरुणाई मतदान आणि निवडणुकांकडे फारशी गांभीर्याने बघत नाही, हे गृहीतक पुरेसे चुकीचे ठरावे एवढा चांगला प्रतिसाद देत यंदाच्या महापालिका निवडणुकीत शहरातील तरुणाईने मंगळवारी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर दुसरीकडे फर्ग्युसन महाविद्यालयातील राज्यशास्त्राच्या 12 विद्यार्थ्यांनी आपल्या एका सर्वेक्षणातून समाजभानाची वेगळी प्रचिती दिली. "निवडणुका-मतदान-मतदारांची मानसिकता' या त्रयींबाबत त्यांनी आपली काही संशोधनपर निरीक्षणं आणि निष्कर्षही मांडले.

राज्यशास्त्र विषयांतर्गत असलेली एक असाईनमेंट म्हणून हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात विविध प्रभागांतील वेगवेगळ्या मतदारांना एकूण दहा प्रश्‍न विचारण्यात आले. विशेष बाब म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांसोबतच काही परदेशी विद्यार्थ्यांनीही त्यात आपला सहभाग नोंदवला. यापैकीच फहीम या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्याशी, तसेच ओशीन आणि अनिकेत या भारतीय विद्यार्थ्यांशी "सकाळ'ने संवाद साधला.

विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्‍न
गेल्या वेळी तुम्ही मतदान केले होते की नाही, यंदा मतदान करणार आहात का, मतदान करताना नक्की काय पाहता, गेल्या वेळी ज्या अपेक्षा ठेवून मतदान केले, त्या पूर्ण झाल्या का, निवडणुकांसाठीच्या जाहिरातींवर केल्या जाणाऱ्या खर्चाबद्दल आपली मतं काय, व्यक्ती/उमेदवाराला पाहून मतदान करता की पक्षाला?... असे काही मूलभूत प्रश्‍न या सर्वेक्षणातून मतदारांना विचारण्यात आले.

मतदान प्रक्रिया किती सुगम्य?
या सर्वेक्षणासोबतच आपली एकूण मतदान प्रक्रिया पुरेशी सुगम्य आहे की नाही, याच्याही नोंदी या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर जाऊन घेतल्या. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या "सुगम्य भारत' योजनेच्या अनुषंगाने या नोंदी घेण्यात आल्या. अंध-अपंगांसाठी केंद्रांवर आवश्‍यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत की नाही, हे देखील त्यात पाहण्यात आले. त्यासाठी अनिकेत हा दृष्टिहीन विद्यार्थीही स्वतः एका केंद्रावर काही तास उभा राहिला. मात्र, अनेक केंद्रांवर अंध-अपंगांना मतदानासाठी मदत होईल, अशा सुविधा नव्हत्या आणि मदतनीसही नव्हते, असे उदासीन व्यवस्था वास्तव या विद्यार्थ्यांना अनुभवास आले.

भारतातील निवडणुका पाहून मी भारावून गेलो आहे. मला हा अनुभव घेताना खूप छान वाटतंय. मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती कमी भासत असली, तरी अनेक जण विचारपूर्वक मतदान करतात; हे पाहून बरं वाटलं. बरेचसे जाणकार लोक उमेदवारांनी केलेली कामं पाहतात आणि मगच मतदान करतात, केवळ पैसा किंवा पक्ष पाहून नाही. ही बाब नक्कीच महत्त्वाची आहे. या देशात रुजलेल्या लोकशाहीची अनेक अंगे मला जाणवली.
- फहीम, अफगाणिस्तानचा विद्यार्थी

Web Title: party is the importance of the candidate