प्रचार कार्यालये बनली ‘मार्केट’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे - मतदारांची ‘सरबराई’ करण्याच्या उद्देशाने इच्छुक आता आपापल्या प्रभागांमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंसह फळे, पालेभाज्या स्वस्तात उपलब्ध करून देत आहेत. विशेषत: महिला मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अशा ‘क्‍लृप्त्या’ योजल्या जात आहेत. त्यामुळे प्रचार कार्यालयांना ‘दुकानां’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.    

पुणे - मतदारांची ‘सरबराई’ करण्याच्या उद्देशाने इच्छुक आता आपापल्या प्रभागांमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंसह फळे, पालेभाज्या स्वस्तात उपलब्ध करून देत आहेत. विशेषत: महिला मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अशा ‘क्‍लृप्त्या’ योजल्या जात आहेत. त्यामुळे प्रचार कार्यालयांना ‘दुकानां’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.    

सहकारनगरमधील एका राजकीय पक्षाच्या इच्छुकाने डाळी आणि कडधान्याबरोबरच दर रविवारी माफक दरात पालेभाज्यांची उपलब्धता केली आहे. त्यात, विविध प्रकारच्या डाळी जेमतेम ५० ते ७० रुपयांमध्ये (१ किलो) उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष आहे. आपल्या घराजवळच्या कार्यालयात आपल्या सोयीसाठी या वस्तू उपलब्ध असल्याचे फलक उभारण्यास इच्छुक विसरले नाहीत. त्यासाठी प्रभागातील गल्लीबोळात ‘फ्लेक्‍सबाजी’ केल्याचे दिसून येत आहे. 

प्रभागांमध्ये वातावरणनिर्मिती करतानाच मतदारांना आपलेसे करण्याच्या उद्देशाने चौकाचौकांमध्ये इच्छुकांनी कार्यालये थाटण्यास सुरवात केली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने प्रचाराचे नियोजन करतानाच, कार्यकर्त्यांची उठबस वाढविण्याच्या कचेऱ्या उभारल्या जात आहेत. कार्यकर्त्यांपाठोपाठ मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यालयांमध्ये विविध सेवा पुरविण्याचा प्रयत्न इच्छुकांनी सुरू केला आहे. त्यात, प्रामुख्याने घरगुती वापराच्या वस्तू स्वस्तात दिल्या जात आहेत. गेल्या आठवड्यापासून विविध राजकीय पक्षांतील इच्छुकांच्या प्रचार कार्यालयांच्या उद्‌घाटनांचा धडाकाच सुरू झाला आहे. 

दुसरीकडे प्रचार कार्यालयांच्या माध्यमातून घरोघरी प्रचार पत्रके वाटण्यात येत आहेत. ‘एसएमएस’ आणि ‘व्हॉट्‌सॲप’च्या माध्यमातून इच्छुकांनी प्रचाराला सुरवात केली आहे. कार्यालयांत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची विचारपूस आणि त्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूकही केली आहे.  

आठवडी बाजार 
महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उपनगरातील इच्छुकांनी गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजार भरविण्यास सुरवात केली आहे. त्यात, ‘शेतकरी ते ग्राहक’ ही योजना राबवून ग्राहकांना ताजे आणि स्वस्तात फळे आणि पालेभाज्या उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात दर रविवारी इच्छुकांकडून आठवडी बाजार भरविण्यात येत आहे. एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू मिळत असल्याने नागरिकांचाही त्याला प्रतिसाद मिळत आहे.

नागरिकांच्या सेवेसाठी...
मतदारांपाठोपाठ कार्यकर्त्यांबरोबर जवळीक वाढविण्याच्या उद्देशाने इच्छुक दिवसभर कार्यालयांमध्ये बसत आहेत. मतदारांच्या प्रत्येक समस्या जाणून त्या तातडीने सोडविण्याच्या हालचालीही ते लगेचच करीत आहेत, त्यामुळे चोवीस तास नागरिकांच्या सेवेत राहण्याचा खटाटोप ते करताना दिसत आहेत.

Web Title: party offices become Market promotion