स्मार्ट सिटीत डावलण्यामागे भाजपचे राजकारणच

स्मार्ट सिटीत डावलण्यामागे भाजपचे राजकारणच

पिंपरी - स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचवड शहराला स्थान मिळाले नाही. याबाबत नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राजकीय वर्तुळातूनही याबाबत भाजपवर राजकीय षडयंत्राचा आरोप होत आहे. शहरात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने क्षमता असूनही स्मार्ट सिटीच्या यादीतून शहराला वगळले आहे. भाजपचा सहकारी शिवसेनेनेही यात राजकारण होत असल्याचे सांगत दुजाभावाचा आरोप केला आहे. राजकीय वर्तुळातून याबाबत व्यक्‍त झालेल्या काही प्रतिक्रिया...

निवडीत राजकारण
ऍड. गौतम चाबुकस्वार (आमदार) - स्मार्ट सिटीत निवड न झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर अन्याय झाला आहे. केंद्र सरकारने स्मार्ट सिटीच्या 20 शहरांची यादी जाहीर केली. त्या वेळी शहराच्या समावेशाबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडली होती. आता पुन्हा देशातील 27 शहरांची यादी जाहीर झाली व त्यातही आपल्या शहराचा समावेश केला नाही. यामुळे स्मार्ट सिटीच्या निवडीत राजकारण झाले आहे असे म्हणायला आता हरकत नाही. यापुढेही आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत.

पुण्याचे नाव हीच चूक
महेश लांडगे (आमदार) -
पिंपरी-चिंचवड शहराच्या पुढे आपण पुणे शहराचे नाव लावतो ही आपली चूक आहे. आपल्या शहराचे स्वतंत्र अस्तित्व असल्याचे यामुळे दिसून येत नाही. मात्र, यामध्ये राजकारण झाले असे म्हणता येणार नाही. आपण पात्र असतानाही डावलले गेलो आहे. याबाबत आपण पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत.

महसूल देऊनही डावलले
श्रीरंग बारणे (खासदार) -
स्मार्ट सिटीमध्ये निवड होण्यासाठी राज्याकडून केंद्राकडे नावे जातात. याबाबत आपण लोकसभेत विचारणा केली होती. तसेच वेंकय्या नायडू यांनाही विचारले होते. केंद्र आणि राज्याला पिंपरी-चिंचवड शहरातून मोठा महसूल जातो. याशिवाय आपण स्मार्ट सिटीमध्ये समावेश होण्यासाठी पात्र असतानाही डावलले गेलो, यामुळे राज्य शासन दुजाभाव करीत असल्याचे दिसून येते.

शहरवासीयांचा अपमान
सचिन साठे (शहराध्यक्ष, कॉंग्रेस) -
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांकडून भरभरून मते घेतली. महापालिका 100 टक्‍के पात्र असल्याने पहिल्या यादीतच नाव येणे अपेक्षित होते. मात्र, केंद्र व राज्याने तीन वेळा यादीत डावलून शहरवासीयांचा अपमान केला आहे. यामुळे शहरातील नागरिक त्यांना कदापि माफ करणार नाहीत. या अपमानाचा बदला आगामी महापालिका निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही. खासदार व आमदारांनीही आपल्या कामाचे आत्मपरीक्षण करावे.

श्रेय तुम्ही घ्या; पण शहर स्मार्ट करा
राहुल कलाटे (शिवसेना शहरप्रमुख) -
 केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश होईल, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. मात्र, त्यांची पुन्हा निराशाच झाली. स्मार्ट सिटी प्रवेशाचे श्रेय कुणीही घ्यावे. मात्र, स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कर वाढवू नये.

विकासकामांत तरी राजकारण नको
राहुल भोसले -
पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेस्ट सिटीसह अनेक पुरस्कार मिळविले आहेत. यामुळे स्मार्ट सिटीच्या पहिल्याच यादीत समावेश होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तिसऱ्या यादीतही आपल्या शहराचे नाव आहे नाही, यामुळे निवडीत राजकारण होत असल्याचे वाटते. शहराचा विकास झाला तर आपोआप देशाचा विकास होतो. यामुळे विकासामध्ये तरी राजकारण आणू नये.

भ्रष्टाचारामुळे डावलले गेल्याची शक्‍यता
लक्ष्मण जगताप (आमदार) -
जेएनएनयूआरएम या केंद्र सरकारच्या योजनेतून पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. सरकारने विविध योजनांसाठी दिलेल्या पैशापेक्षा 40 ते 50 टक्‍के जादा दराने कामे देण्यात आली. यामुळेच केंद्र व राज्य सरकारने स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीतून पिंपरी-चिंचवड शहराला डावलले असण्याची शक्‍यता आहे. मात्र, स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश करावा, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

शंभर टक्‍के राजकारण
संजोग वाघेरे (राष्ट्रवादी शहराध्यक्ष) - राजकारण करायच्या ठिकाणी करावे मात्र विकासकामांत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नये. जर स्मार्ट सिटीमध्ये शहराचा समावेश झाला असता, तर त्याचे श्रेय राष्ट्रवादीला मिळाले असते. कोणत्या कारणासाठी आम्हाला डावलले याचे उत्तर त्यांनी शहरातील नागरिकांना द्यावे. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडला डावलण्यामागे त्यांचेच षडयंत्र आहे.

भाजपने कोणते प्रयत्न केले
सचिन चिखले (शहराध्यक्ष, मनसे) - स्मार्ट सिटीबाबत भाजपकडून शहरवासीयांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. वास्तविक पाहता पहिल्याच यादीत पिंपरी-चिंचवड शहराचे नाव येणे अपेक्षित होते. ते न आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आरडा-ओरडा केला होता. मात्र, स्मार्ट सिटीत येण्यासाठी त्यांनी व लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. स्मार्ट सिटीत डावलण्यामागे भाजपचे राजकारण असून, त्या विरोधात आंदोलन केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com