कॉंग्रेस आणि मनसेला पिंपरी-चिंचवडमध्ये धक्के

उत्तम कुटे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसमधील गळती सुरूच असून आता महिला शहराध्यक्षा ज्योती भारती यांनी पक्षाला टाटा केला आहे. आठवडाभरात बसलेल्या या दुसऱ्या धक्‍याने कॉंग्रेसला, ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर 'बुरे दिन'आले आहेत. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने (एनसीपी) अद्याप आघाडीसाठी प्राथमिक बोलणीही सुरू न केल्याने पक्षाची वाट आगामी पालिका निवडणुकीत आणखी बिकट होण्याची भीती कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अशीच काहीशी अवस्था राज ठाकरे यांच्या 'मनसे'चीही उद्योगनगरीत झाली असून हा पक्षही कॉंग्रेसच्या वाटेवर आहे. 

आठ दिवसांपूर्वीच माजी शहराध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यासह सात नगरसेवकांनी कॉंग्रेसला हात दाखवीत 'एनसीपी'त प्रवेश केला होता. या पहिल्याच मोठ्या जोरदार धक्‍यातून पक्ष सावरला नसताना आठवडाभरातच भारती यांनीही पक्ष सोडल्याने पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. संघटनेत डावलले जात असल्याचे कारण या दोन्ही प्रकरणात देण्यात आल्याने त्याची आता,तरी पक्षश्रेष्ठींनी दखल घ्यावी, अन्यथा प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यावेळचे पक्षाचे शहरातील वैभव पूर्ण लोप लावेल, अशी भीती जुन्या कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.

पालिका निवडणुकीसाठी शहर कॉंग्रेसने नुकत्याच घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत डावलले गेल्याने राजीनामा दिल्याचे भारती यांनी 'सकाळ'ला सांगितले. तसेच माझ्यासारख्या पदाधिकाऱ्यालाही विश्‍वासात घेतले जात नसल्याचीही ती परिणती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेबद्दल खुलासा करताना त्यांनी अद्याप त्याबाबत निर्णय घेतला नसल्याचेही सांगितले. दरम्यान, वर्षभर निष्क्रिय असल्याने पक्ष काढून टाकेल या भीतीतून भारती यांनी पक्ष सोडला असल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.

मनसेचेही इंजिन भरकटणार?
गतवैभव लयास जाऊ लागलेल्या कॉंग्रेसच्याच वाटेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही शहरात आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांची एक सभाही न होता गत पालिका निवडणुकीत मनसेचे चार नगरसेवक शहरात निवडून आले होते. मात्र, त्यातील दोघांनी नुकताच पक्ष सोडला असून एक शिवसेना आणि दुसरे भाजपमध्ये गेले आहेत. तसेच माजी शहराध्यक्ष मनोज साळुंकेसह अनेक पदाधिकारी सुद्धा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आज (ता.5) 'मनवासे'चे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेससारखी मनसेचीही गळती सुरूच असून त्यामुळे या दोन्ही पक्षांची अवस्था निवडणुकीच्या तोंडावर दयनीय झाली आहे.मात्र, दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी याची अद्याप म्हणावी, तेवढी व तशी दखल न घेतल्याबद्दल दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते चिंतेत आहेत.
 
Web Title: party switching jolts to congress, mns