Vidhan Sabha 2019 : झोपडपट्टी पुनर्वसन रखडले; गुन्हेगारीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

झोपडपट्टीमधील रहिवाशांचे पुनर्वसन, पूरग्रस्तांच्या चाळींचा रखडलेला विकास, वाढती गुन्हेगारी, सातारा रस्त्यावरील बीआरटी आणि मार्केट यार्डातील विविध प्रश्‍नांमुळे पर्वती विधानसभा मतदारसंघातील स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. कलाग्राम व ट्रान्स्पोर्ट हबसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम सुरू झाले असले, तरी झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडविण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे.

विधानसभा 2019
वार्तापत्र - पर्वती विधानसभा मतदारसंघ

पुणे -  झोपडपट्टीमधील रहिवाशांचे पुनर्वसन, पूरग्रस्तांच्या चाळींचा रखडलेला विकास, वाढती गुन्हेगारी, सातारा रस्त्यावरील बीआरटी आणि मार्केट यार्डातील विविध प्रश्‍नांमुळे पर्वती विधानसभा मतदारसंघातील स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. कलाग्राम व ट्रान्स्पोर्ट हबसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम सुरू झाले असले, तरी झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडविण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे.

पर्वती परिसरातील कचरा प्रश्‍न, सिंहगड रस्त्यावरील कोंडी, यासह मतदारसंघातील मूलभूत सुविधांच्या अभावी नागरिक त्रस्त असून, आमच्या किमान गरजा भागवा, अशी मागणी ते करीत आहेत. या मतदारसंघात पर्वती, तळजाई व आंबेडकर वसाहत, आंबिल ओढा, दांडेकर पूल, पानमळा, लक्ष्मीनगर, अण्णा भाऊ साठेनगर, संतनगर, जनता वसाहत यांसारख्या छोट्या-मोठ्या ४३ झोपडपट्ट्या आहेत. तेथील पक्के रस्ते, पाणी व वीजपुरवठा, स्वच्छता असे बरेच प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. काही ठिकाणी विजेचे खांब उभे करून पक्के रस्ते तयार केले. मात्र, अद्यापही इतर ठिकाणी या समस्या सुटलेल्या नाहीत. पानशेतला पूर आल्यानंतर तेथील बाधितांचे पद्मावती, सहकारनगर, महर्षिनगरमध्ये पुनर्वसन केले. या चाळींतील इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पुनर्विकास करण्याची मागणी येथील रहिवासी करीत आहेत. मात्र, याबाबत कोणताच ठोस  निर्णय झालेला नाही. 

सिंहगड रस्त्याचा काही भाग या मतदारसंघात येतो. रस्त्यावरील कोंडी आणि त्या परिसरातील नागरी समस्या दिवसागणिक वाढतच आहेत. पर्वती आणि तळजाई या दोन्ही टेकड्यांच्या परिसरातील अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे वृक्षतोड होत असून, हिरवळीचे प्रमाण कमी झाले आहे. पुण्याचे वैभव असलेल्या या दोन्ही टेकड्यांचे अस्तित्व राखण्यासाठी ठोस निर्णयांची गरज आहे. नवश्‍या मारुती चौकातील स्कायवॉकसारखी अनेक कामे प्रलंबित असून, त्याचा स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. 

झोपडपट्टीमधील गुन्हेगारी वाढतच आहे. येथील सामाजिक सुरक्षा व सलोखा राखण्याचे आव्हान लोकप्रतिनिधी व पोलिस प्रशासनासमोर आहे. शहरातील अनेक गुन्हेगार या परिसरात राहायला आले आहेत, तसेच येथील गुन्ह्यांचे प्रमाणही जास्त आहे.  

मतदार म्हणतात 
 सुचेता इनामदार - आश्‍वासने पूर्ण झालेली नाहीत. ती कधीच पूर्ण होत नाहीत. सहकारनगरमध्ये भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यांवर ही कुत्री धावून येतात. त्यासह बेकायदा पार्किंग, कचरा आणि वाहतूक कोंडी फुटलेली नाही.

 संजीव काळे - मी राहत असलेल्या ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर कचरा साठलेला असतो. तो रोजच्या रोज उचलला जात नाही. स्वच्छता नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथील मैदानाचे सुशोभीकरण करावे.

 संजय खंदारे - गटारे तुंबल्यानंतर आठ-दहा दिवस त्याची दुरुस्ती होत नाही. तळजाई वसाहतीमधील बेकायदा धंदे व गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही वर्षांत येथील समस्या बिकट झाल्या आहेत.

काय आहेत प्रश्‍न...
  पक्के रस्ते, पाणी व वीजपुरवठा, स्वच्छता 
  पूरग्रस्तांच्या चाळींतील इमारती जुन्या 
  सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी
  पर्वती, तळजाईवरील वृक्षतोड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parvati Assembly Constituency