प्रवासी व कामगार वाहतूक संपामुळे बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

विद्यार्थी वाहतूक आजपासून सुरळीत होणार

विद्यार्थी वाहतूक आजपासून सुरळीत होणार
पुणे - मालवाहतूकदारांच्या राष्ट्रीय आंदोलनाचे पडसाद शहरात शुक्रवारी उमटले. ट्रॅव्हल्स कंपन्यांची खासगी प्रवासी वाहतूक, तसेच कामगार वाहतूक बंद होती, तर विद्यार्थी वाहतूकही विस्कळित झाली होती. मात्र, प्रवासी आणि विद्यार्थी वाहतूक शनिवारपासून सुरळीत होणार आहे. ट्रक, ट्रेलर, टेंपोचालकांचा संप बेमुदत असेल.

डिझेलच्या किमती कमी कराव्यात, टोलमुक्त वाहतूक असावी, तृतीयमार्गी विमा हप्त्यात पारदर्शकता असावी, एजंटांचे अतिरिक्त कमिशन रद्द करावे आदी विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसने 20 जुलैपासून राष्ट्रीय स्तरावर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. त्याअंतर्गत ट्रक व्यावसायिकांनी बेमुदत संप केला आहे.

त्यांना शहरातील पुणे बस ओनर्स असोसिएशन, पुणे डिस्ट्रिक्‍ट लक्‍झरी बस असोसिएशन, पिंपरी- चिंचवड बस ओनर्स असोसिएशन, पुणे जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी शुक्रवारी वाहतूक बंद ठेवली होती, असे संघटनांचे प्रतिनिधी राजन जुनावणे, बाबा शिंदे, प्रसन्न पटवर्धन यांनी सांगितले. मागण्यांबाबत पुढील सात दिवसांत तोडगा निघाला नाही, तर खासगी प्रवासी वाहतूकही बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे पटवर्धन यांनी नमूद केले.

मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश आदी भागांतील खासगी ट्रॅव्हल्सच्या बस शुक्रवारी बंद होत्या. बंगळूर, इंदूर, हैदराबाद आदी शहरांत वाहतूक करणाऱ्या आंतरराज्य बससेवा सकाळपर्यंत सुरू होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बंद झाली. खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ग्राहकांना संपाची पूर्वकल्पना दिली होती, त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. ट्रॅव्हल्सच्या संपामुळे एसटी प्रवाशांमध्ये वाढ झाली. परंतु, पावसाळा असल्यामुळे ती फार मोठी वाढ नव्हती, असे एसटीच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले.

रिक्षा, व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला; परंतु संपात भाग घेतला नाही. मात्र, खासगी बसमधून ज्या शाळांची विद्यार्थी वाहतूक होते ती शुक्रवारी बंद होती. परिणामी शहरातील विद्यार्थी वाहतूक विस्कळित झाली होती. कामगारांची वाहतूक करणारीही बससेवा बंद होती.

मालवाहतुकीवर परिणाम होणार
ट्रक, टेंपो, ट्रेलर चालकांचा बंद बेमुदत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी म्हणजे आज फारसा परिणाम झाला नाही. परंतु, पुढील दोन- तीन दिवसांत धान्य, भाजीपाला, दूध, तसेच माल वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: passenger worker transport close by strike