रेल्वे रूळ ओलांडण्यावर प्रवाशांचा भर; प्रशासनाचा काणाडोळा 

दीपेश सुराणा 
गुरुवार, 7 जून 2018

धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडण्याऐवजी प्रवाशांनी ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करायला हवा. 
- काशिनाथ चव्हाण, प्रवासी. 

पिंपरी : शहरातील सर्व रेल्वे स्थानकांवर पादचारी मार्ग असताना देखील सर्रास धोकादायकरीत्या रेल्वे रूळ ओलांडण्याकडे प्रवाशांचा कल असल्याचे चित्र बुधवारी पाहण्यास मिळाले. रेल्वे स्थानकांशिवाय अन्य ठिकाणी असलेल्या रेल्वे पादचारी पुलाचा देखील वापर अल्प प्रमाणात होत आहे. रेल्वे फाटक बंद असताना देखील नागरिक रेल्वे रूळ ओलांडत होते. त्याकडे रेल्वे प्रशासन काणाडोळा करीत आहे. 
आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसींग जागृती दिवस गुरुवारी (ता.7) आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, शहरातील प्रमुख रेल्वे स्थानक, पादचारी पुल, रेल्वे फाटक आदींची "दै.सकाळ'च्या प्रतिनिधीने बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचा हा वृत्तांत. 

पिंपरी रेल्वे स्थानक : येथे दोन फलाट आणि दोन पादचारी पूल आहेत. रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशांपैकी काही प्रवासी खुष्कीचा मार्ग म्हणून पादचारी पुलाचा वापर न करता थेट रूळ ओलांडून जातात. 

चिंचवडस्टेशन रेल्वे स्थानक : येथील फलाट क्रमांक चारवरून मुख्यत्वे रेल्वे रूळ ओलांडून पलीकडे जाण्यावर प्रवाशांचा सर्रास भर असतो. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाने धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडू नये, असा सूचनाफलक तेथे लावलेला आहे. फलाट क्रमांक 2 आणि 3 मध्ये असलेल्या रेल्वे रुळावरून देखील प्रवासी ये-जा करीत होते. 

आकुर्डी रेल्वे स्थानक : आकुर्डी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 1 आणि 2 मध्ये असलेल्या रेल्वे रुळावरून प्रवासी धोकादायक पद्धतीने ये-जा करीत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. 

दापोडी रेल्वे फाटक : दापोडी येथील रेल्वे फाटक बंद असताना देखील पादचारी रुळावरून धोकादायक पद्धतीने सर्रास ये-जा करीत होते. 

आकुर्डी-बिजलीनगर व प्राधिकरण-बिजलीनगर रेल्वे पादचारी पूल : या दोन्ही रेल्वे पादचारी पुलांचे अनुक्रमे आकुर्डी आणि प्राधिकरण बाजूकडील संरक्षक कठडे तुटलेले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी येथून ये-जा करणे धोक्‍याचे झाले आहे. आकुर्डी-बिजलीनगर पादचारी पुलावरून जाण्याऐवजी रूळ ओलांडून नागरिक ये-जा करीत होते. 

धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडण्याऐवजी प्रवाशांनी ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करायला हवा. 
- काशिनाथ चव्हाण, प्रवासी. 

रेल्वे स्थानकावरून नागरिकांनी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी आम्ही जनजागृती करणार आहोत.
- रतन रजक, स्थानकप्रमुख, आकुर्डी रेल्वे स्थानक 

Web Title: passengers railway crossing in Pimpri