पटेल रुग्णालय ‘सलाइन’वर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लोकसंख्या तब्बल ७० हजार आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय केवळ ११० खाटांचे आहे. त्यातही आयसीयूसारख्या अद्ययावत सुविधांच्या अभावामुळे उपचारासाठी रुग्णांना अन्य सरकारी रुग्णालयांत हलवावे लागते.

पुणे - पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील लोकसंख्या तब्बल ७० हजार आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय केवळ ११० खाटांचे आहे. त्यातही आयसीयूसारख्या अद्ययावत सुविधांच्या अभावामुळे उपचारासाठी रुग्णांना अन्य सरकारी रुग्णालयांत हलवावे लागते.

घोरपडी, कोंढवा, भवानी पेठ, लुल्लानगर, फातिमानगर यांसह कॅंटोन्मेंटच्या लगतच्या भागातील नागरिक उपचारासाठी या रुग्णालयात येतात. दररोज सातशेहून अधिक नागरिक बाह्यरुग्ण विभागात येतात. रुग्णालय एकशे दहा खाटांचे असले, तरी मॅटर्निटी वॉर्डातील खाटांची संख्या केवळ २८ आहे. त्यामुळे अनेकदा महिला रुग्णांना दाखल करून घेता येत नाही. रुग्णालयातील एक्‍स रे, सोनोग्राफी विभाग आणि लॅबोरेटरी मात्र अद्ययावत आहे.

रुग्णालयात अद्ययावत असे इन्टेसिव्ह केयर युनिट (आयसीयू) आणि व्हेंटिलेटर नसल्याने हृदयविकार असलेले वा अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करता येत नाहीत. त्यांना ससून वा अन्य रुग्णांमध्ये पाठवावे लागते. हार्मोन, थायरॉईडची चाचणी करण्याची यंत्रणादेखील रुग्णालयाकडे नाही. त्यासाठी लष्करी रुग्णालयाची मदत घ्यावी लागते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विस्ताराची गरज 
कॅंटोन्मेंट परिसराची लोकसंख्या लक्षात घेता या भागासाठी किमान ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय असावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. याबाबत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. डी. गायकवाड म्हणाले, ‘‘रुग्णालयाच्या विस्तारीकरणास मान्यता मिळाली आहे. मॅटर्निटी वॉर्डसाठी नवी इमारत बांधण्यात येणार आहे. तेथील खाटांची संख्या २८ वरून ६५ होईल. नवजात शिशुंसाठी आयसीयूमध्ये पाच बेड आहेत. विस्तारानंतर त्यांची संख्या दहा होईल.’’

आजाराची साथ आल्यास जागा कमी पडते. आयसीयू नव्याने होत आहे आणि मॅटर्निटी वॉर्डसाठी वर्षभरात नवी इमारत होईल. तसेच रुग्णालय मल्टिस्पेशालिटी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
- प्रियांका श्रीगिरी, उपाध्यक्ष, पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड

उपलब्ध सुविधा
डायलिसिस सेंटर, रक्तचाचण्यांची लॅबोरेटरी, एक्‍स रे, सोनोग्राफी युनिट
अभाव
आयसीयू, व्हेंटिलेटर, तसेच थायरॉइडच्या चाचण्यांसाठी यंत्रणा नाही. खाटांची अपुरी संख्या.

 परिचारिका : ४०
 डॉक्‍टरांची संख्या : ५२
 तंत्रज्ञ आणि कर्मचारी : ३५
 रुग्णवाहिका : २

Web Title: Patel Hospital Issue