रुग्णाची माहिती एका 'क्‍लिक'वर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

कमला नेहरू रुग्णालयात "युनिक आयडेंटिफिकेशन' सेवा

कमला नेहरू रुग्णालयात "युनिक आयडेंटिफिकेशन' सेवा
पुणे - कमला नेहरू रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना "युनिक आयडेंटिफिकेशन' क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आवश्‍यक असणारी रुग्णाची इत्थंभूत वैद्यकीय माहिती एका "क्‍लिक'वर उपलब्ध होईल. याचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून, अशा प्रकारची सेवा देणारे कमला नेहरू हे राज्यातील दुसरे रुग्णालय ठरले आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व प्रमुख रुग्णालये एकमेकांशी संगणकाद्वारे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णाला "युनिक आयडेंटिफिकेशन' क्रमांक दिला जातो. त्या क्रमांकावर रुग्णाची सर्व वैद्यकीय माहिती संकलित केली जाते. त्यामुळे तो रुग्ण ही सुविधा असलेल्या इतर कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर त्याच्यावर यापूर्वी केलेले उपचार, त्याला दिलेली औषधे याची सविस्तर माहिती संबंधित रुग्णालयातील डॉक्‍टरांना मिळते. त्या आधारावर ते पुढे प्रभावी उपचार करतात. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागापुरती मर्यादित असलेली ही योजना आता शहरातील रुग्णांपर्यंत पोचविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात "एनआयसी'ने तांत्रिक मदत दिली आहे. यापूर्वी नवी मुंबई महापालिकेतील एक रुग्णालय या प्रकल्पांतर्गत जोडले गेले आहे. त्यानंतर पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय या प्रकल्पात जोडले जात असल्याची माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

कमला नेहरू रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गागरे म्हणाले, 'रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात यश आले आहे. लवकरच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संगणकावर नोंदणी होईल. त्यातून "युनिक आयडेंटिफिकेशन' क्रमांक निर्माण होईल.''

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, 'कमला नेहरू रुग्णालयातील पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला आहे. रुग्णांची नावनोंदणी हा त्याचा पहिला टप्पा आहे. त्यानंतर रुग्णालयांचे वैद्यकीय अहवाल, प्रयोगशाळांमधील अहवाल असा टप्प्या-टप्प्याने हा प्रकल्प पुढे जाईल.''

शहरातील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देण्यातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत असून लवकरच पूर्ण होईल. सुरवातीच्या टप्प्यात हा फक्त कमला नेहरू रुग्णालयात सुरू आहे. त्याच्या यशानंतर शहरातील इतर रुग्णालयांमध्ये ही सुविधा राबविण्यात येईल.
- डॉ. एस. टी. परदेशी, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका.

रुग्णांना काय फायदा होईल?
- युनिक आयडेंटीफिकेशनमुळे रुग्णांना कागदपत्रे सांभाळावी लागणार नाहीत
- रुग्णाची सर्व वैद्यकीय माहिती रुग्णालयात संकलित केली जाईल
- राज्यातील मोठ्या सरकारी रुग्णालयाशी कमला नेहरू रुग्णालय जोडले जाईल
- "पेपरलेस' रुग्णालयाच्या दिशेने टाकलेले पाऊल
- प्रयोगशाळेतील वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल डॉक्‍टरांना ऑनलाइन मिळणार

Web Title: patient information on one click