रुग्णांचा ओढा ‘खासगी’कडे

Patient
Patient

पिंपरी - यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) हे सध्या साथीच्या रुग्णांनी भरले आहे. त्यात डेंगीच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. औषधांच्या निविदा प्रक्रियेकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असून, सध्या रुग्णालयात किरकोळ औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. तसेच, अतिदक्षता विभागाच्या कमतरतेमुळे दररोज १० ते १२ असे महिन्याला २०० ते ३०० रुग्ण खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत.

वायसीएममध्ये सध्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने तिसरा अतिदक्षता विभाग सुरू करण्याची गरज आहे. मात्र, या अतिदक्षता विभागात लागणारी यंत्रणा व यंत्रसामग्रीअभावी काम रखडले आहे. त्यामुळे रुग्णांवर खासगी रुग्णालयांत जाण्याची वेळ आली आहे. शहर परिसरातील व बाहेरील रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. मात्र, आता खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कार्डियाक मॉनिटर्स आणि सिरींज पंपचीदेखील कमतरता आहे. सिरींज पंप हे औषधांची पातळी ठरविते, तर कार्डियाक मॉनिटर्सद्वारे हृदयाचे ठोके व रक्तदाब मोजता येतो. या महत्त्वाच्या व अत्यल्प दराच्या सुविधाही वायसीएममध्ये वेळेवर उपलब्ध होत नाहीत. शिवाय, सर्व कार्यालयीन प्रक्रिया वेळखाऊ असल्याने डॉक्‍टरांची धांदल उडत आहे.

खाटांची कमतरता
साथीच्या आजारांमुळे रुग्णांमध्ये वाढ झाली असून, खाटांची कमतरता जाणवत आहे. सध्या रुग्णालयात एकूण ८५० खाटा आहेत. मात्र, अतिरिक्त ताण आल्यास जवळपास २५० खाटांची उणीव भासते. त्यामुळे रुग्णांना बाहेर धाव घ्यावी लागते. त्यातही रुग्णाची स्थिती बिकट असेल, तर नातेवाइकांसह सर्वांची भंबेरी उडते. वायसीएममधूनच दुसऱ्या दवाखान्याचा संदर्भ दिला जातो. परिणामी, ३० ते ४० रुग्णांना दाखलच करून घेतले जात नाही. त्यामुळे येथील जागेचा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही.

व्हेटिंलेटर नादुरुस्त 
गेल्या चार ते पाच वर्षांपासून १५ व्हेंटिलेटर दुरुस्तीअभावी पडून आहेत. सध्या दोन आयसीयूमध्ये १५ खाटांवर १४ व्हेटिंलेटर सुरू आहेत. तर, दुसऱ्या आयसीयूमध्ये १९ खाटांवर ११ व्हेटिंलेटर सुरू आहेत. तर, नव्याने २० व्हेटिंलेटर खरेदी प्रक्रियेत अडकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com