रुग्णांना स्मार्ट कार्ड; कॅंटोन्मेंटच्या पटेल रुग्णालयाचा कारभार होणार संगणकीकृत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचा कारभार संगणकीकृत होणार आहे. याअंतर्गत उपचार करणाऱ्या रुग्णांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असून, रुग्णांवर केलेल्या उपचाराची माहिती डॉक्‍टरांना एका क्‍लिकवर उपलब्ध होईल. 

पुणे : पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचा कारभार संगणकीकृत होणार आहे. याअंतर्गत उपचार करणाऱ्या रुग्णांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असून, रुग्णांवर केलेल्या उपचाराची माहिती डॉक्‍टरांना एका क्‍लिकवर उपलब्ध होईल.

रुग्णालयाच्या कामात सुसूत्रता येण्याबरोबरच पारदर्शकता आणण्यासाठी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या परिसरातील रुग्ण असल्यास तसा उल्लेख त्यावर केला जाणार आहे. एकदा उपचार घेऊन रुग्ण गेल्यास त्याची माहिती या स्मार्ट कार्डमुळे रुग्णालयास तत्काळ समजेल. तो रुग्ण पुन्हा आल्यास आधीच्या आजाराच्या माहितीच्या आधारे त्याच्यावर कोणता उपचार करायचा, हे डॉक्‍टरांना समजू शकेल. तसेच संगणकीकरणामुळे डॉक्‍टरांना दिलेली औषधे फार्मसी विभागाला संगणकाच्या स्क्रीनवर दिसतील. त्यानुसार ती रुग्णाला दिली जातील.

रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. डी. गायकवाड यांनी सांगितले, की संगणकीकरणामुळे रुग्णांची नोंदणी करण्यापासून त्यांना औषधे देण्याच्या नोंदी संगणकावर होतील. यामुळे रुग्णाचे बिलदेखील त्यावर तयार होणार आहे. त्यातील मानवी हस्तक्षेप संपणार आहे. प्रत्येक रुग्णाला स्मार्ट कार्ड दिल्याने त्याच्यावर किती वेळा आणि कोणता उपचार केला, हेही समजेल. यातून कारभारामध्ये पारदर्शकता येईल, औषधांचा गैरवापर टळेल. रुग्णावर आधी केलेल्या उपचाराची नोंद झाल्याने भविष्यात त्याच्यावर उपचार करताना त्या नोंदींचा उपयोग होऊ शकेल. 

रुग्णालयाचा कारभार संगणकीकृत करण्याबरोबरच रुग्णालयाचे संकेतस्थळदेखील तयार होणार आहे. या रुग्णालयात विविध आजारांवरील विशेषतज्ज्ञ येत असतात. त्यांच्या येण्याचा वार आणि वेळा संकेतस्थळावर दिल्या जातील. यामुळे रुग्णांना डॉक्‍टरांकडे येण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यांना रुग्णालयात येऊन नंबर लावण्याची गरज उरणार नाही, असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. 

कामकाजाचे संगणकीकरण, संकेतस्थळ आणि स्मार्ट कार्ड या सुविधा एकाच वेळी सुरू होतील. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. - डॉ. व्ही. डी. गायकवाड (मुख्य वैद्यकीय अधिकारी) 

Web Title: Patients get smart card; patel Hospital of Cantonment will be Computerized