राष्ट्रभक्तीसाठी साहित्याची गरज - पुरंदरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

पुणे - ‘कवी यशवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर, ग. दि. माडगुळकर अशी दीर्घ परंपरा मराठी साहित्याला लाभली आहे. मात्र त्या समृद्ध साहित्य परंपरेतील स्फुल्लिंग, अंगार अलीकडील साहित्यात दिसत नाही. तरुणांच्या अंगातील रक्त राष्ट्रभक्तीने पेटून उठेल, अशा आशयाचे साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. समाजाला नवी दिशा देणारे साहित्यकार तयार होणे आवश्‍यक आहे,’’ असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या १२२व्या वर्धापन दिन आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिक वितरण समारंभात सोमवारी ते बोलत होते. या वेळी आनंद केळकर स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गौरव’ पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना प्रदान करण्यात आला. साहित्य आणि समाज या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. संस्थेचे अध्यक्ष प्र. ल. गावडे, उपाध्यक्ष गो. बं. देगलूरकर, उपाध्यक्ष पुष्पा लिमये, कार्यवाह अ. नी. नवरे आणि सहकार्यवाह अ. श्री. चाफेकर आदी उपस्थित होते. पारितोषिकप्राप्त ग्रंथपुरस्कारांचेही या वेळी वितरण करण्यात आले.

पुरंदरे म्हणाले, ‘‘अलीकडील साहित्य वाचले, की ते कशाच्या तरी सावलीखाली झाकोळल्याचे दिसून येते. उथळ साहित्यनिर्मितीपेक्षा धीरगंभीर साहित्य कसे निर्माण होईल, यावर साहित्यिकांनी भर द्यावा. तरुणांमध्ये महत्त्वाकांक्षा जागृत करणाऱ्या साहित्याची निर्मिती होणे गरजेचे आहे.’’

जोशी म्हणाले, ‘‘लिखित ज्ञान साधने येण्याआधी वक्तृत्व हेच महत्त्वाचे कार्य बजावत असे. लेखन दीर्घ काळ टिकते आणि वक्‍त्याचे शब्द वाऱ्यावर उडून जातात, असे काही जणांना वाटते. मात्र, लेखक आपले शब्द कागदावर उमटवतो, तर वक्ता आपले शब्द श्रोत्याच्या अंतकरणावर उमटवतो. लेखणी आणि वाणी ही दोन्ही शब्दशक्तीची रूपे आहेत.’’

Web Title: Patriotism need for material