नीरा डावा कालव्यावर भरारी पथकाची गस्त (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

वालचंदनगर - नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याचा हेडचा वेग ६५० क्‍युसेक व टेलचा वेग १६१ क्‍युसेक आहे. कालव्यातून दररोज सुमारे ४८९ क्‍युसेक पाण्याची गळती होते. त्यात पाणीचोरी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

वालचंदनगर - नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याचा हेडचा वेग ६५० क्‍युसेक व टेलचा वेग १६१ क्‍युसेक आहे. कालव्यातून दररोज सुमारे ४८९ क्‍युसेक पाण्याची गळती होते. त्यात पाणीचोरी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

रब्बीच्या दुसऱ्या हंगामातील पिकांसाठी नीरा डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडले आहे. वीर धरणापासून इंदापूर तालुक्‍यापर्यंत कालव्याची लांबी सुमारे १५३ किलोमीटर आहे. इंग्रजांच्या काळातील कालवा असल्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच याचा गैरफायदा ही अनेक शेतकरी घेत असून, पाणीचोरीचा सपाटा लावतात. सध्या कालव्याच्या हेडमधून ६५० क्‍युसेक वेगाने पाणी वाहत आहे; तर हेडमधून सोडलेले पाणी टेलच्या ५९ क्रमांकाच्या वितरिकेतून १६१ क्‍युसेक वेगाने वाहत आहे. सुमारे ४८९ क्‍युसेक पाण्याची गळती व चोरी होत आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

कालव्यालगतची विद्युत रोहित्र बंद केली आहेत. तसेच पाणीचोरीवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये पाटबंधारे विभागातील पुणे, बारामती कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. बारामती व इंदापूर तालुक्‍यामध्ये गस्त सुरू आहे. सध्या शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचे काम सुरू असून, २०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर रब्बीच्या हंगामातील पिकांना पाणी दिले जाणार आहे. तीन टीएमसी पाण्यामध्ये रब्बीचे आवर्तन पूर्ण करायचे आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रब्बीच्या आवर्तनास सुरवात होणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नीरा डाव्या कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग
 वीर धरण (हेड) - ६५० क्‍युसेक 
 शारदानगर (माळेगाव) - ४९० क्‍युसेक
 सणसर - ३३७ क्‍युसेक
 अंथुर्णे - २५६ क्‍युसेक
 निमगाव केतकी (५९ क्रमांकाची वितरिका) - १६१ क्‍युसेक

Web Title: Patrol of the Squad at Neera Left Canal