वरखडे बाप-लेकींवर अंबडवेट येथे अंत्यसंस्कार

वरखडे बाप-लेकींवर अंबडवेट येथे अंत्यसंस्कार

पौड  - कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडालेल्या बस दुर्घटनेत अंबडवेट (ता. मुळशी) येथील वरखडे परिवारावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत संतोष बबनराव वरखडे (वय ४२), त्यांच्या दोन्ही मुली ज्ञानेश्‍वरी (वय १६) आणि गौरी (वय १४) या तिघांचा मृत्यू झाला. संतोष यांच्या पत्नी मनीषा या जखमी झाल्या आहेत. शनिवारी (ता. २७) सायंकाळी वरखडे बाप-लेकींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

एकाच परिवारातील तिघांचा एकाच वेळी मृत्यू होण्याची ही तालुक्‍यातील पहिलीच घटना आहे. भावाला नऊ वर्षांनंतर मुलगा झाल्याने त्याचा नवस फेडण्यासाठी मनीषा वरखडे या पती, दोन मुलींना घेऊन भाऊ, बहीण, भावजय, पुतणे, भाचे यांच्यासह गणपती पुळ्याला मिनीबसने गेल्या होत्या. गणपती पुळ्याचे दर्शन उरकल्यानंतर शुक्रवारी (ता. २६) कोल्हापूरकडे येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी कठडा तोडून थेट नदीत पडली. त्यात गाडीतील तेरा जणांचा मृत्यू झाला. संतोष, ज्ञानेश्‍वरी, गौरी या बापलेकीही पाण्यात बुडाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मनीषा या जखमी असून, कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघाताची माहिती अंबडवेटमधील ग्रामस्थांना समजली. सकाळपासून वरखडे यांच्या घराजवळ ग्रामस्थांची गर्दी होऊ लागली. संतोष यांचे आईवडील, भाऊ, इतर नातेवाईक यांनी एकच हंबरडा फोडला. त्यामुळे उपस्थितांना रडू अनावर झाले. दोन रुग्णवाहिन्यांतून तिघांचे मृतदेह दुपारी एकच्या सुमारास गावात आणण्यात आले. ट्रॅक्‍टरमधून तिघांचीही अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास तिघांवर मुळा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले.  

संतोष हे पत्रकार विजय वरखडे यांचे थोरले बंधू होते. सर्वांशी मिळून मिसळून राहणारे शांत व मितभाषी संतोष कंपनीत नोकरी करून कुटुंबाची 
उपजीविका भागवीत होते. संतोष यांच्या पत्नी मनीषा घोटावडे फाट्यावरील ब्रिंटन कार्पेट कंपनीत कामाला आहेत. त्यांना गौरी आणि ज्ञानेश्‍वरी या दोनच मुली. ज्ञानेश्‍वरी ही दहावीला तर गौरी नववीत शिकत होती. दोन्ही मुली पुण्यातील सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत शिकत होत्या.

एकाच दिवशी मृत्यूयात्रा आणि लग्नसोहळा...
केदारी, वरखडे आणि नांगरे कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्यामुळे बालेवाडी गावावर शोककळा पसरली होती. त्याचदिवशी येथील रहिवासी भाजपचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर यांच्या मुलाचा आज विवाहसोहळा होता; परंतु या अपघातामुळे बालवडकर यांच्या मुलाचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. कोठेही आतषबाजी न करता विवाहसोहळा पार पडला. संपूर्ण बालेवाडीकर केदारी परिवाराच्या दुःखात सहभागी झाले होते. बालेवाडीतील नागरिकांनी आज एकीकडे जड अंतःकरणाने मृत्यूयात्रा; तर दुसरीकडे त्याचदिवशी लग्नसोहळा असा विचित्र अनुभव घेतला. 

शववाहिकांच्या सायरनचा आवाज...
अपघातामधील मृतांवर बालेवाडीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मृत सचिन केदारी यांचे वडील आणि भाऊ कोल्हापूरला गेले होते. त्यामुळे गावात घरचे कोणीच नव्हते. ग्रामस्थांनी अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास चार शववाहिका बालेवाडी गावात आल्या. शववाहिकांच्या सायरनच्या आवाज आला आणि शांतता पसरलेल्या बालेवाडीतील वातावरण गंभीर झाले. एकाचवेळी नऊजणांचे मृतदेह पाहून नातेवाइकांनी हंबरडा फोडला. 

अनेकांना अश्रू अनावर
मृतांमध्ये सर्वांत लहान असलेल्या नऊ महिन्यांच्या सान्निध्यचा मृतदेह खाली उतरवला. हृदय पिळवटून टाकणारे दृश्‍य होते. अनेकांना अश्रू अनावर झाले. शववाहिकेतून एकेक करून सर्व मृतदेह खाली उतरवण्यात आले. सर्वांनी साश्रू नयनांनी अंत्यदर्शन घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com