पवन मावळ : निसर्गाचा अनोखा नजारा

Pawan-Maval
Pawan-Maval

पवनानगर - मावळात लोहमार्गाजवळ असणारी आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ या दुर्गम व डोंगराळ भागात पर्यटकांना भुरळ घालणारी असंख्य अपरिचित निसर्गरम्य ठिकाणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून पवना परिसर हा पर्यटकांना भुरळ घालणारे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर किल्ल्याबरोबर पवना धरणाचा परिसर पर्यटकांना खेचून आणत आहे.

धार्मिक पर्यटनही 
दुधिवरे खिंडीजवळ ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी प्रतिपंढरपूर साकारले आहे. येथील आध्यात्मिक आणि निसर्गाचा सहवास हवाहवासा वाटणारा आहे. येथील मंत्रमंदिर पाहण्यासारखे आहे. येथून लोहगडचे विहंगम दृश्‍य पाहायला मिळते. किल्यावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. जवणमार्गे वाघेश्‍वरला जाता येते. येथे वाघेश्‍वराचे मंदिर आहे. पवना धरण शंभर टक्के भरल्याने मंदिर पाण्याखाली आहे. ग्रामस्थांनी मंदिराची प्रतिकृती धरणाच्या काठावर वसविलेली आहे. येथे शाकाहारी, मांसाहारी हॉटेल, घरगुती जेवणाची सोय आहे. 

विहंगम पवना धरण
लोणावळ्याहून लोहगड खिंडीमार्गे पंधरा किलोमीटरवर अंतरावर पवना धरण आहे. डोंगर फोडून तयार केलेली दुधिवरे खिंड पाहण्यासारखी आहे. पवना धरणाच्या भिंतीजवळ गेल्यानंतर आपल्याला पवना धरणाचा अथांग जलाशय दिसतो. सर्व बाजूने जणू शिलेदार म्हणूनच तिकोना, तुंग, लोहगड विसापूर उभा असल्याचे दिसते. दुधिवरे खिंडीतून जाणे सायंकाळी पाचनंतर टाळावे.  

कृषी पर्यटनाची पर्वणी
ग्रामीण भागातील कुटुंबातील वाढती सदस्य संख्या, शेतीचे मर्यादित क्षेत्र व उच्च शिक्षणाचा अभाव यामुळे बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली. येथील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचे कृषी पर्यटनाचा नवा फंडा सुरू केला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात टेंट व्यवसायाला सुरवात केली आहे. त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याकडून निसर्गाच्या सानिध्यात मुक्काम, दोन वेळा अस्सल मावळी जेवण, चहा- नाष्ट्याची उत्तम सोय, हे येथील आकर्षण ठरत आहे.

किल्लेच किल्ले...
पवन मावळात गेले की लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांचे दर्शन होते. या किल्ल्यांना जाताना लोणावळा, कामशेत आणि पौड या तिन्ही बाजूने येणास रस्ता आहे. लोहगड विसापूरला जाण्यासाठी दुधिवरे खिंडीपासून रस्ता आहे, तर तिकोना गावातून किल्ल्यावर जाता येते. तुंगला जाण्यासाठी लोणावळ्याहून सोपे जाते. या किल्यांवरून पवन मावळाचे मनमोहक रूप पर्यटकांना न्याहाळता येते. 

ऐतिहासिक लेणीचा सहवास
पवन मावळच्या परिसरातील वाऱ्यावर डोलणारे हिरवेगार भाताची खाचरे लक्ष वेधून घेतात. बेडसे येथील प्राचीन बौद्धलेणी पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून जात असतात. येथे असणाऱ्या धबधब्यांचीही मजा पर्यटक घेताना दिसतात.

जेवण कोठे कराल ?
पवनानगर, पवना जलाशय परिसर, तिकोना, जवण

पेट्रोल पंप - कडधे
गॅरेज, पंक्‍चर दुकाने - पवनानगर, कडधे, जवण, तुंगी, करुंज, थुगाव, शिवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com