पवन मावळातील रिंगरोडचा मार्ग बदलावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

सोमाटणे - बागायती शेती वाचवण्यासाठी पवन मावळातून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोडचा मार्ग बदलावा, अशी मागणी साळुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, गोडुंब्रे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

सोमाटणे - बागायती शेती वाचवण्यासाठी पवन मावळातून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोडचा मार्ग बदलावा, अशी मागणी साळुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, गोडुंब्रे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

शेतकऱ्यांनी म्हटले आहे, प्रस्तावित रिंगरोड हा मुळशी तालुक्‍यातील हिंजवडी, मारुंजी, नेरे गावाहून पवन मावळातील सांगवडे, साळुंब्रे, दारुंब्रे, गोडुंब्रे, धामणे, परंदवडी, उर्से मार्गे तळेगाव एमआयडीसीला जोडणार आहे. हा रिंगरोड ११० मीटर रुंदीचा प्रस्तावित आहे. त्याच्या दोन्ही बाजूंनी पाचशे मीटर रहिवासी झोन ठेवण्यात येणार आहे. परिणामी, या रिंगरोडमुळे मावळातील सर्वांत सुपीक जमीन असलेल्या सांगवडे, साळुंब्रे, दारुंब्रे, गोडुंब्रे येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर बागायती जमिनी जाणार आहेत. या चार गावांच्या जमिनी वाचवण्यासाठी हा रिंगरोड कासारसाईमार्गे जिरायती क्षेत्र अधिक असलेल्या चांदखेड, परंदवडीमार्गे प्रस्तावित करावा. 

‘‘सरकारने यापूर्वी पवना धरण, द्रुतगती मार्ग, गहुंजे स्टेडियमसाठी पवन मावळातील शेतकऱ्यांच्या घेतल्या असून, बऊर एसइझेड, पवना जलवाहिनीसाठी जमिनीवर टाकलेले शिक्के अजूनही काढलेले नाहीत. असे असतानाही आता नव्याने रिंगरोडसाठी आणखी जमिनी संपादनाचा घाट घातला आहे. त्यामुळे पवनमावळातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. मावळ, मुळशी तालुक्‍यातील सर्वांत सुपीक व काळी जमीन याच गावातील असल्याने गेल्या अनेक पिढ्यांपासून येथील शेतकरी ऊस, भाजीपाला, फुलशेती, भात, भुईमूग आदी नगदी पिके घेतात. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही याच भागात मोठ्या प्रमाणात चालतो. शेती हे एकमेव उत्पन्नाचे स्रोत असल्याने येथील शेतकऱ्यांचे एकमेव उदर
निर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे रस्त्यात जमिनी गेल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल,’’ असेही या गावातील शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

रिंगरोडचा मार्ग बदलल्यास लांबी कमी होईल. त्यातून बागायती जमिनी वाचतील व पीएमआरडीचा रस्त्यासाठीचा खर्च कमी होईल. शिवाय संपूर्ण पवन मावळाचा विकास होईल. रस्ता सरळ होऊन रस्त्याला वळण राहणार नाही. किमान याचा विचार करून सरकारने रिंगरोडचा मार्ग बदलावा.
- राजाराम राक्षे, माजी संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना

Web Title: pawan maval ring road route change