पवना धरणातील साठा बाष्पीभवनामुळे कमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मार्च 2019

१० - क्षमता दशलक्ष घनमीटर
६०५.४५ मीटर - पाणीपातळी
९९.१५ मीटर - उपयुक्त साठा
४१.१४ टक्के - बुधवारचा साठा

पिंपरी -  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा बाष्पीभवनामुळे झपाट्याने कमी होत आहे. केवळ १५ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा बुधवारी  (ता. २७) धरणात शिल्लक होता. 

परिणामी, उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणीही वाढल्याचा विचार करून जलसंपदा विभाग व महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. 

शहरात एक मार्चपासून पाणीकपात सुरू आहे. पाणीपुरवठा वितरण यंत्रणेनुसार शहराचे भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. मात्र, काही भागांत पाणीच पोचत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही सोसायट्यांनी पुरेशा पाण्यासाठी टॅंकरचा आधार घेतला आहे. 

दरम्यान, पवना धरणातील पाणीसाठा विचारात  घेऊन जलसंपदा विभागाने ऑक्‍टोबरमध्येच दहा टक्के पाणीकपात सुरू करण्याची सूचना महापालिकेला केली होती. मात्र, राजकीय पदाधिकाऱ्यांचा पाणीकपातीस विरोध होता. अखेर एक मार्चपासून पाणीकपात सुरू झाली आहे. त्यानुसार महापालिकेने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. 

त्याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे म्हणाले, ‘‘पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून ४८० ते ४९० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध पाणी उपसा दररोज केला जातो. मात्र, सध्या ४६० ते ४७० एमएलडी अशुद्ध पाणी उपसा केला जात आहे. एक मार्चपासून पाणीकपात सुरू आहे. सर्वांना पुरेसे पाणी मिळेल, याचा विचार करून आठवड्यातून एक दिवस एका भागाचा पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची  मागणी वाढली आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे.’’ 

पवना धरणात ४१ टक्के पाणीसाठा आहे. दरवर्षीच्या तुलनेत पाण्याची मागणी वाढली आहे. उन्हामुळे बाष्पीभवन होत असून, पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुढील काळाची गरज ओळखून आतापासूनच पाणी  जपून वापरण्याची गरज आहे. 
- ए. एम. गदवाल, शाखा अभियंता, पवना धरण 

Web Title: Pawana dam to supply water to reduce evaporation