पवनात वाढणार एक टीएमसी पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगाव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून पंधरा दिवसांत २१ हजार ट्रक गाळ काढण्यात आला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात एक टीएमसीने पाणीसाठा वाढणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या निधीतून सलग तीन वर्षे धरण क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम केले.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगाव, देहूरोड आणि मावळातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून पंधरा दिवसांत २१ हजार ट्रक गाळ काढण्यात आला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात एक टीएमसीने पाणीसाठा वाढणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या निधीतून सलग तीन वर्षे धरण क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम केले.

जल संवर्धन व पवना धरणातील जलसंचय वाढवून पिंपरी-चिंचवड शहरातील, तसेच मावळवासीयांच्या पाण्याची समस्या सोडविण्याच्या या कामात सलग तिसऱ्या वर्षी सातत्य ठेवले आहे. मागील सलग दोन वर्षे क्‍युबिक मीटर गाळ पवना धरण क्षेत्रातून काढल्यानंतर या वर्षी पुन्हा मेपासून गाळ काढण्याचे धरण क्षेत्रात सुरू करण्यात आले. पवना धरण क्षेत्रातील ठाकूरसाई, खडक देवंडे, जोण, आपटी अशा विविध गावांसह हे गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाची बारणे यांनी गुरुवारी (ता. २४) पाहणी केली. पाटबंधारे शाखा अभियंता मनोहर खाडे, तांत्रिक सहायक तांबोई, अमित कुंभार आदी उपस्थित होते.

बारणे म्हणाले, ‘‘या वर्षी काम सुरू केल्यानंतर मागील दिवसांत धरण क्षेत्रातून आजअखेर ३१ हजार क्‍युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. मागील दोन वर्षांत धरणातून ७५ हजार क्‍युबिक मीटर गाळ काढण्यात आला होता. या कामात सलग तीन वर्षे सातत्य ठेवल्यामुळे तब्बल १०६ क्‍युबिक मीटर गाळ आजअखेर धरण क्षेत्रातून काढण्यात आला आहे. त्यामुळे पवना धरणात आता एक टीएमसी अधिक पाणीसाठा होणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात आणखी अतिरिक्त जलसंचय धरणात होणार आहे. हा अतिरिक्त पाणीसाठा शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच मावळातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

महापालिका व सरकारी यंत्रणेने हे गाळ काढण्याचे धाडस केले नाही. परंतु, पिंपरी-चिंचवड शहराला २०१५ मध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता. गेल्या वर्षी एकवेळ पाणीपुरवठा होता. गाळ काढल्याने या वर्षी तशी पाणीटंचाई भासणार नाही. हा मोठा फायदा असल्याने पाठपुरावा प्रयत्न करून हे काम सुरू केल्याचे विशेष समाधान असल्याचे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.

‘शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही’
स्थानिक शेतकऱ्यांशी खासदार बारणे यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून गाळ काढण्याचे काम करणाऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही. त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सायंकाळी उशिरा गाळ वाहतूक करू देऊ नका. याकडे लक्ष देण्यास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

Web Title: pawana dam water