पाणीकपातीला राजकीय विरोध

Water-Supply
Water-Supply

पिंपरी - पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. मात्र, राजकीय पक्षांची पाणीकपातीला मान्यता मिळत नसल्याने महापालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करीत आहे. हिवाळ्यात पाणीकपात टाळल्यास उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणात पाणी कपात करावी लागेल. एप्रिलपासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करावा लागण्याची शक्‍यता आहे.

पवना धरणात सध्या ६.५५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे ७७.०८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी सहा डिसेंबरला धरणात ७.४६ टीएमसी म्हणजे ८७.६८ टक्के पाणीसाठा होता. याचाच अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात जवळपास ११ टक्के साठा कमी आहे. महापालिकेला वर्षाला ६.११ टीएमसी म्हणजे दरमहा सरासरी अर्धा टीएमसी पाणी लागते. 

महापालिका रावेत बंधाऱ्यातून रोज ४८० ते ४९० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी घेते. त्याचबरोबर एमआयडीसीकडून तीस एमएलडी पाणी घेते. मात्र, वितरण व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याने सर्वांना पुरेसे पाणी पुरविताना महापालिका यंत्रणेची तारांबळ उडते. एप्रिल महिन्यात पाण्याची मागणी वाढते. त्या वेळी दरवर्षीच महापालिकेला अडचणीला तोंड द्यावे लागते. महापालिकेने २०१७ मध्ये दोन मे ते दोन जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला होता. त्या वेळी ४०० ते ४१० एमएलडी पाणी पुरविण्यात आले होते. 

धरणात साठा कमी असल्यामुळे महापालिकेने ४८० ऐवजी ४४० एमएलडी पाणी घ्यावे, असा निर्णय चार ऑक्‍टोबरला झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जलसंपदा विभागाने २० ऑक्‍टोबरला तो निर्णय महापालिकेला कळविला. मात्र, पाणीकपातीचा निर्णय प्रशासनाने अद्याप घेतला नाही. प्रशासनाने गेल्या आठवड्यात महापौर राहुल जाधव यांच्यासह सर्व पक्षनेत्यांची बैठक घेऊन ही माहिती दिली. या संदर्भात या आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही.

पिंपळे गुरव, दापोडीत पुरवठा विस्कळित
पिंपरी - पिंपळे गुरव, दापोडी आणि नव्या सांगवीतील काही भागांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून विस्कळित होत आहे. येथील जमतानी चौकातील मुख्य गुरूत्व वाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी सायंकाळी पुन्हा या परिसराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. शुक्रवारी सकाळीही संबंधित भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 

पिंपळे सौदागर, दापोडीत यापूर्वी जलवाहिनीत झालेली गळती दुरुस्त करण्यात आली. पिंपरीतील जमतानी चौकातील जलवाहिनीत सोमवारी गळती झाली. मंगळवारी संबंधित जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर तिथेच काही मीटरवर जलवाहिनीत पुन्हा दुसरी गळती झाल्याचे बुधवारी लक्षात आले. त्याची दुरुस्ती गुरुवारी पाणीपुरवठा विभागाकडून सुरू होती. त्यामुळे या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा होणाऱ्या पिंपळे गुरव, दापोडी, वैदुवस्ती, सुदर्शननगर तसेच नवी सांगवीच्या काही भागांतील पाणीपुरवठा गुरुवारी सायंकाळी विस्कळित झाला. 

दापोडी परिसरात गेल्या दहा दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त रहिवाशांनी बुधवारी दापोडी येथे पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. याबाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून आवश्‍यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

पाऊस उशिरा येणार असल्याची शक्‍यता गृहीत धरून जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा ठेवला पाहिजे. धरणात गेल्यावर्षीपेक्षा ११ टक्के साठा कमी आहे. तो जूनअखेरपर्यंतच पुरेल. त्यामुळे महापालिकेने पाणीकपात केली पाहिजे. सध्या कपात न केल्यास उन्हाळ्यात पाणी कपात जास्त करावी लागेल.
- अशोक शेटे, उपविभागीय अभियंता, पवना धरण

पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यासाठी पालिकेतील पक्षनेत्यांची बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल. त्यांच्यापुढे दिवसाआड पुरवठा, आठवड्यातून एका भागात एक दिवस पाणी बंद किंवा सध्या कपात न करता उन्हाळ्यात कपात करावयाची, असे पर्याय आहेत. बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करू.
- श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त

पिंपरीतील जमतानी चौकातील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पिंपळेगुरव, दापोडी, नवी सांगवीतील काही भागाचा सायंकाळचा पुरवठा विस्कळित झाला. दुरुस्तीचे काम आजच पूर्ण केले जाईल. तथापि, शुक्रवारी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्‍यता आहे.
- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com