पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना पाण्याची चिंता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

नागरिकांची मागणी? 
सध्या ३० टक्‍के पाणीकपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दोन दिवसांचे पाणी एका दिवसात मिळत असल्याने पुरेशा दाबाने पाणी मिळते. यामुळे नागरिकांकडून होणाऱ्या कमी दाबाने आणि अपुऱ्या पाण्याच्या तक्रारी पुन्हा कमी झाल्या आहेत. मात्र, हीच संधी साधत काही अधिकारी शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करा, अशी नागरिकांची मागणी असल्याचे सांगत आहेत.

पवना धरणात अवघा १४ टक्‍के पाणीसाठा शिल्लक
पिंपरी - जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा पाऊस अखेरच्या आठवड्यापर्यंत आलेला नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातही अवघा १४ टक्‍के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाचे आगमन आणखी लांबल्यास शहरवासीयांवर पाणीसंकट येऊ शकते. यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

पवना धरणातून तळेगाव, देहूरोड, वाघोली आणि पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होतो. दरवर्षी परतीचा पाऊस चांगला होत असल्याने ऑक्‍टोबरपर्यंत पवना धरणातून पाणी सोडावे लागत नाही. मात्र, गेल्या वर्षी परतीचा पाऊस न झाल्याने सप्टेंबरपासूनच पाणी धरणातून सोडण्यास सुरवात झाली. यामुळे ऑक्‍टोबरमध्ये धरणातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर आला. शहरवासीयांना रोज पाणी दिल्यास धरणातून महिनाभरात नऊ टक्‍के पाणीसाठा कमी होतो. 

याशिवाय गेल्या काही वर्षांत पावसाचे आगमन लांबणीवर पडत असल्याने पाणीपुरवठा विभाग जुलैअखेरपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करतो. यंदाही अशाच प्रकारचे नियोजन केले आहे. ३० टक्‍के पाणीकपात लागू केल्याने सध्या धरणात १४ टक्‍के पाणी शिल्लक आहे. मात्र, पाऊस आणखी लांबल्यास शहरावर पाणीसंकट येऊ शकते.

शहराला पूर्वी सकाळ-संध्याकाळ असा दोन वेळा पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने पाणीपुरवठा विभागाने दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली. यामुळे पाण्याच्या तक्रारी कमी झाल्याचा दावा केला. मात्र, लोकसंख्येत वाढ झाल्याने पाण्याची मागणी वाढली आहे; तसेच पाणीचोरीच्या घटनाही वाढत असल्याने पाणी पुरेशा दाबाने मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. लवकरच पावसाला सुरवात झाल्यास आणि पवना धरणात जोपर्यंत ४० टक्‍के पाणीसाठा होत नाही तोपर्यंत पाणीकपात सुरू ठेवण्याचा विचार पाणीपुरवठा विभागाचा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pawana Dam Water Storage Water Issue