पवना, इंद्रायणी नद्या ‘आजारी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

पिंपरी - पवना आणि इंद्रायणी या दोन्ही नद्यांची प्रकृती फार खराब आहे, त्या खूपच ‘आजारी’आहेत. लोकसहभागातून त्यांचे शुद्धीकरण नितांत गरजेचे आहे, त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी आज येथे सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील पवना आणि इंद्रायणीच्या शुद्धीकरण काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींची बैठकीत ते बोलत होते. त्या वेळी विनोद बोधनकर, नरेंद्र चुग, राजेंद्र भावसार, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, राजीव भावसार, प्रवीण लडकत, आबा मसुडगे, सचिन लांडगे, शेखर चिंचवडे, सुनील जोशी यांच्यासह संस्था, संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

राजेंद्रसिंग म्हणाले,‘‘ इथे दोन्ही नद्यांवर काम करण्याची गरज आहे. नदीचे आरोग्य हे अगदी माणसाच्या आरोग्यासारखे आहे. नदीला आपण ‘आई’ म्हणतो, पण आज तीच आजारी पडली आहे, तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांच्या मदतीने जागृतीमधून ते शक्‍य आहे. नद्या स्वच्छ, प्रवाही राहण्यासाठी समाजानेही योगदान दिल्यास अडचण येणार नाही, चांगली चळवळ उभी राहील. आपण त्यासाठी नेतृत्व करायला तयार आहोत.’’ 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राज्यकर्ते, प्रशासन हे इतरांच्या तुलनेत अधिक सधन, सक्षम आणि संवेदनशील असल्याने हे काम सहज शक्‍य असल्याचे सांगून ते म्हणाले,‘‘ सुरवातीला देहू ते आळंदी या दरम्यान इंद्रायणी नदीच्या कामावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नदीतील केवळ जलपर्णी काढून भागणार नाही, तर नदीत मिसळणारे नाल्यांचे सांडपाणी प्रथम बंद केले पाहिजे. नदीचा उगम ते संगम अशा सर्व टप्प्यांवर काम केले पाहिजे. डोंगरदऱ्यातून वाहून येणारी माती नदीत साठत गेली की ती मृत होते, म्हणून त्याचा बंदोबस्त केला पाहिजे.’’ लोकसहभागातून पवना नदीतील जलपर्णी काढण्याच्या वाल्हेकरवाडी रोटरी क्‍लबच्या उपक्रमाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.

सहा लाखांचे काम ६० लाखांना
सांगली जिल्ह्यातील नदीवर बांध घालण्याचे काम अवघे सहा लाखांत झाल्याचा किस्सा नरेंद्र चुग यांनी सांगितला. त्यावर बोलताना, हेच काम सरकारी पातळीवर ६० लाखांवर गेले असते, असा शेरा डॉ. राजेंद्रसिंग यांनी मारला.

कार्यकर्ते म्हणाले...
राजीव भावसार : पवना शुद्ध करण्यासाठी शहरातील सांडपाण्याचे नाले प्रथम बंद करण्याची गरज आहे.

आबा मुसुडगे : इंद्रायणी देहू ते आळंदी शुद्धीकरणासाठी उद्योजक, स्वयंसेवी संस्थांचा आणखी हातभार लागला पाहिजे.  

नरेंद्र चुग : शहरातील तीनही नद्यांचे प्रदूषण पाहता आता नदी सुधार प्रकल्पासाठी स्वतंत्र अधिकारी असला पाहिजे.

सचिन लांडगे : डॉ. राजेंद्रसिंग यांनी नदी सुधारसाठी पिंपरी-चिंचवड शहराला मार्गदर्शन केले तर तमाम जनता सहभागी होईल.

Web Title: pawana indrayani river pollution cleaning