पवनामाईसाठी सरसावली तरुणाई

मिलिंद संधान
शुक्रवार, 25 मे 2018

नवी सांगवी - ज्या नदीच्या पात्रात आम्ही बालपणी खेळलो, बागडलो, स्वच्छ पाण्यात पोहायला शिकलो, तिच्या काठाकाठाने फिरता-फिरता आंबट-गोड बोरे चाखली, त्या नदीची प्रदूषित अवस्था आता बघवत नाही. त्यामुळेच आमची पवनामाई स्वच्छ करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, ही भावना आहे पिंपळे गुरव येथील तरुणाईची. केवळ भावनाच नव्हे, तर प्रत्यक्ष कामाला त्यांनी सुरवात केलेली आहे. 

पिंपळे गुरव व कासारवाडी यांना जोडणारा पूल ते पिंपळे गुरव व दापोडी यांना जोडणाऱ्या पुलापर्यंत पवना नदीची स्वच्छता सार्वजनिक मंडळातील युवकांनी सुरू केली आहे. त्यांना महापालिकेचे सहकार्य लाभले आहे. भैरवनाथ तरुण मंडळ, चावडी ग्रुप, जागृती मित्र मंडळ, जय भवानीनगर व वैदू समाज मित्र मंडळ आदी मंडळे या पवनामाई स्वच्छता उपक्रमात सहभागी झाली आहेत. 

पहिला टप्पा
कासारवाडी पुलापासून गावठाणापर्यंत सुमारे पाचशे मीटर अंतरात नदीची स्वच्छता सध्या सुरू आहे. नदीपात्रातील गवत, वेली, अन्य पान वनस्पती, नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरणारी झुडपे, खडक व गाळ जेसीबीच्या साह्याने काढला जात आहे. नदीपात्रातून मैलामिश्रित पाण्याच्या वाहिन्या गेल्या आहेत. तेथील चेंबरभोवती दाट पाणवनस्पती, तण, झुडपे वाढली आहेत. त्यांच्या मुळामुळे चेंबरला तडे गेले आहेत. त्यामुळे मैलामिश्रित पाणी थेट नदीत मिसळत असल्याचे स्वच्छतेदरम्यान आढळून आले. असे चेंबर दुरुस्त केले जात आहेत. नदीच्या काठावर दोन्ही बाजूंनी मातीचा रॅम्प तयार केला आहे. पावसाळ्यात माती वाहून जाऊ नये, यासाठी ‘करंज’ वृक्ष लावली आहेत. काही ठिकाणी देशी झाडेही लावली आहेत. स्मशानभूमीपर्यंतचे काम पूर्ण होत आले असून, दुसऱ्या टप्प्यातील काम पावसाचा अंदाज पाहून सुरू केले जाणार आहे. 

आयुक्तांकडून कौतुक
गेल्या महिन्यात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नदी स्वच्छतेची पाहणी केली. त्या वेळी आयुक्तांनी तरुणांचे कौतुक करून नदी स्वच्छतेबाबत काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार काम सुरू असल्याचे तरुणांनी सांगितले.

Web Title: pawana river cleaning