पवना परिसर ‘हाऊसफुल्ल’

पवना परिसर ‘हाऊसफुल्ल’

पवनानगर, - गेल्या चार दिवसांपासून पाऊस परत सुरू झाल्यामुळे, पवनानगर परिसरामध्ये पर्यटक वर्षाविहारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. 

लोणावळा व पवनानगर परिसर ही पर्यटकांसाठी आवडती ठिकाणे आहेत; परंतु लोणावळा येथील भुशी डॅमकडे दुपारी तीननंतर रस्ता बंद केल्यामुळे अनेक पर्यटकांनी पवनानगरचा रस्ता धरला आहे. त्यामुळे पवनानगर परिसरात गर्दी वाढली आहे. पवना धरणाच्या आंबेगाव येथील धबधब्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर सध्या गर्दी केली आहे, त्यामुळे हा रस्ता गर्दीने फुलून गेला आहे. येथील रस्ता अरुंद असल्याने पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून परिसरात पावसाचा जोर असल्याने अनेक पर्यटकांनी पावसाच्या सरी अंगावर घेत; तर कोणी धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटला. गेल्या काही वर्षांपासून पवना परिसराची ओळख ही पर्यटननगरी म्हणून होत आहे. शहराच्या कानाकोपऱ्यांतून पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत आहेत. पर्यटक आता लोणावळा- खंडाळ्याबरोबर पवना परिसराची निवड करू लागले आहेत. 

या परिसरात पवना धरण, लोहगड किल्ला, श्री क्षेत्र दुधिवरे (प्रतिपंढरपूर), तिकोना किल्ला, तुंग किल्ला, बेडसे लेणी,  तसेच या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तयार झालेले नैसर्गिक धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. 

कासारसाई धरण ८५ टक्के भरले
सोमाटणे - गेल्या तीन दिवसांपासून मावळात संततधार पाऊस सुरू आहे. कासारसाई धरण परिसरात रविवारी ३५; तर आतापर्यंत एकूण ४५५ मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे धरणात उपयुक्त पाणीसाठा १३.६० दशलक्ष घनमीटर; तर एकूण पाणीसाठा १५ दशलक्ष घनमीटर झाला असून धरण ८५ टक्के भरले आहे. यामुळे आढले, पुसाणे, मळवंडी धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. पवना व कासारसाई नद्यांना पूर आला आहे. साळुंब्रे पूल पाण्याखाली असून बेबडओहोळ पुलाजवळ पवना नदी धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. हा पाऊस भातपिकाला उपयुक्त ठरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com