पवना जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द होईपर्यंत विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

आमदार बाळा भेगडे यांची ठाम भूमिका; पोलिसांच्या गोळीबारात मृत शेतकऱ्यांना पवनानगरमध्ये श्रद्धांजली

पवनानगर - पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला कालही विरोध होता, आजही आहे आणि प्रकल्प कायमचा रद्द होईपर्यंत कायम राहणार आहे, असे आमदार बाळा भेगडे यांनी बुधवारी ठामपणे सांगितले.

आमदार बाळा भेगडे यांची ठाम भूमिका; पोलिसांच्या गोळीबारात मृत शेतकऱ्यांना पवनानगरमध्ये श्रद्धांजली

पवनानगर - पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला कालही विरोध होता, आजही आहे आणि प्रकल्प कायमचा रद्द होईपर्यंत कायम राहणार आहे, असे आमदार बाळा भेगडे यांनी बुधवारी ठामपणे सांगितले.

पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पवनानगर येथील शिवप्रसाद मंगल कार्यालयात आयोजित सभेत आमदार भेगडे बोलत होते. भेगडे म्हणाले, ‘‘शांततेत आंदोलन सुरू असताना तत्कालीन आघाडी सरकारने शेतकऱ्यांवर ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल केले. १९० शेतकऱ्यांवरील  हे गुन्हे मागे घेण्याबाबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मंत्रीगटाच्या समितीने क्रांतिकारक निर्णय दिला आहे. आंदोलनात झालेले नुकसानभरपाईची मागणी होती. शेतकऱ्यांकडून एक रुपयाही वसूल केला जाणार नाही. बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करण्यासाठी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार आहे. बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द झाल्यावरच आंदोलन पूर्ण होईल.’’ 

दळवी म्हणाले, ‘‘आंदोलनातील १९० आंदोलक व शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होते. ते सरकारने माघारी घेतले. भाजप सरकार आल्यानंतर मृतांच्या वारसांना नोकरी मिळाली. स्मारकाचेही काम पूर्ण झाले आहे. आता फक्त बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द झाला पाहिजे.’’ सुनील शेळके म्हणाले, ‘‘आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत. तसेच, यानिमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. हीच शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’’  भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजूशेठ खांडभोर यांनीही मनोगत व्यक्त केले. संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर यांनी प्रास्ताविक केले. विश्वनाथ जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
 
श्रद्धांजली सभेत उपस्थिती
भाजपचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, माजी आमदार दिगंबर भेगडे, जलवाहिनी विरोधी कृती समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, एकनाथ टिळे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, माजी सदस्य गुलाबराव वरघडे, पंचायत समिती सदस्या जिजाबाई पोटफोडे, निकिता घोटकुले, सुवर्णा कुंभार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजूशेठ खांडभोर, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे, रिपब्लिकनचे तालुका सरचिटणीस लक्ष्मण भालेराव, भारत ठाकूर यांच्यासह तालुक्‍यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्याय दूर करू - मुनगंटीवार
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांवर दाखल झालेल्या गुह्यांबाबत समितीने निर्णय घेतलेला आहे. याची घोषणा लवकरच जाहीर करून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर केला जाईल.’’

धामणकरांतर्फे वारसांना मदत
मृत शेतकऱ्यांना १२ वाजून ४० मिनिटांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. महाआरोग्य शिबिराचे उद्‌घाटन आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते झाले. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना उर्से येथील बाळासाहेब गजाबा धामणकर यांच्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली.

Web Title: pawananagar pune news Opposition to Pawana water scarcity project permanently canceled