पवना जलवाहिनीला विरोध कायम - आमदार बाळा भेगडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

पवनानगर - ‘‘पवना बंदिस्त जलवाहिनी कायमची रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील. पाणी नेण्यास आमचा विरोध नाही. महापालिकेने गहुंजे येथे बंधारा बांधून तेथून पाणी उचलावे,’’ अशी ग्वाही आमदार बाळा भेगडे यांनी दिली.

पवनानगर - ‘‘पवना बंदिस्त जलवाहिनी कायमची रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील. पाणी नेण्यास आमचा विरोध नाही. महापालिकेने गहुंजे येथे बंधारा बांधून तेथून पाणी उचलावे,’’ अशी ग्वाही आमदार बाळा भेगडे यांनी दिली.

पवना जलवाहिनीबाबत मुंबईत बैठक घेऊन पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. आमदार बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली येथे आज शेतकऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी बाळा भेगडे बोलत होते. भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर, गणेश भेगडे, एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, बाळासहेब घोटकुले, भारत ठाकूर, अमित कुंभार, नामदेव पोटफोडे, शंकर लोखंडे, किसन खैरे, सुदाम घारे, बाळासाहेब जाधव, गणेश धानिवले, अंकुश पडवळ उपस्थित होते.

शेलार म्हणाले, ‘‘बंदिस्त जलवाहिनी; तसेच प्रस्तावित रिंगरोडची योजना रद्द करावी. गेल्या चाळीस वर्षांपासून धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडले आहे. ते मार्गी लावावे.’’ राजेश खांडभोर म्हणाले, ‘‘जलवाहिनीसंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांनी मावळात बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेऊन मगच निर्णय घ्यावा.’’

‘साठवण क्षमता वाढणार’

पवना धरणातून या वर्षी १२ हजार ७८० ब्रास गाळउपसा केल्याने पाणी क्षमता वाढणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरमातून पाणीपुरवठा होतो. या भागातील संपूर्ण शेती पूर्णपणे पवना धरणाच्या पाम्यावर अवलंबून असल्याने यातील गाळ काढल्याने पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे. या हेतूने या वर्षी पिपंरी-चिंचवड महापालिका व मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू झाले. आजअखेर धरणातून १२ हजार ७८० ब्रास एवढा गाळ काढला गेल्याने पवना धरणाच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. या वर्षी १५ मेपासून पवना धरणातून गाळ काढण्यात आला. त्यामुळे धरणामध्ये तीन कोटी ६१ लाख लिटर पाणी वाढणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आली आहे. गेल्या वर्षापासून पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी धरणातून गाळ काढल्यामुळे तीन कोटी ९२ लाख लीटर पाण्याक्षमता वाढल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी गाळ उचलला गेल्याने पाणी क्षमता थोड्या प्रमाणात कमी वाढणार असल्याचे दिसून येते; परंतु अजूनही मॉन्सून पावसाचे आगमन लांबणीवर पडल्याने गाळ काढण्याचे काम सुरू राहणार असल्याने धरणातून माती उपसली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढू शकते.

Web Title: pawananagar pune news pawana waterline oppose