विघ्नहर कारखान्याचे १५ मार्च अखेरीस ऊसाचे एफआरपी प्रमाणे पेमेंट बँकेत जमा

sherkar
sherkar

जुन्नर (पुणे) : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. शुक्रवारी (ता.२३) अखेर ८ लाख ५ हजार ८०० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून ९ लाख ३४ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

साखर उतारा 11.66 टक्के इतका आहे. कारखान्याच्या सह वीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण केलेली ३ कोटी ३५ लाख ४३ हजार युनिट निर्माण झाली ती वीज वितरण कंपनीस विक्री केली आहे. आसवणी प्रकल्पातून ७ लाख २२ हजार ९९७ लिटर इथेनॉल व ४१ लाख ८८ हजार ९९९ लिटर रेक्टीफाईड स्पिरीटचे उत्पादन केले आहे. त्याचप्रमाणे १५ मार्च २०१८ अखेर गाळपास आलेल्या सर्व ऊसाचे रु.२५४०/- प्र.मे.टनाप्रमाणे पेमेंट बँकेत वर्ग केलेले आहे. मार्च अखेर अनेक शेतकऱ्यांना सोसायटी, पतसंस्था अशा विविध ठिकाणे पैसे भरावयाचे असल्यास १ मार्च ते १५ मार्च अखेर गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट दि.२० मार्च रोजी बँकेत वर्ग करून सभासद, ऊस उत्पादकांच्या आर्थिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न कारखान्याने केला असलेचे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.

कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ५ हजार मेट्रिक टन एवढी असतानाही दैनंदिन ५ ते ६ हजार मेट्रिक टनाप्रमाणे गाळप केले जात आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व नोंद झालेल्या ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही, असेही शेरकर यांनी सांगितले.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस झालेने ऊसाचे एकरी उत्पादनात सुमारे १७ ते १८ मेट्रिक टनाने वाढ झाली असल्याने कारखान्याने ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा सुमारे २ लाख ५० हजार मेट्रिक टन जास्तीचे गाळप करावे लागणार आहे. यामुळे ऊस तोडणीस थोडासा विलंब होत आहे. तरी सर्व सभासद व उत्पादकांनी काळजी करण्याचे कारण नाही. असे शेरकर यांनी सांगितले. यावर्षी सुमारे २९० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. मागील ४० लाख मेट्रिक टन अशी एकूण ३३० लाख मेट्रिक टन साखर यावर्षी उपलब्ध होणार आहे. त्यामधून देशांतर्गत खप २५० लाख मेट्रिक टन वजा जाता ८० लाख मेट्रिक टन साखर अतिरिक्त राहणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने अनुदानासह साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्यामुळे अतिरिक्त झालेली साखर कमी होऊन देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या साखरेचे बाजारभाव वाढणेस मदत होईल. त्याचा फायदा साखर कारखान्यांना होऊन थकीत अथवा अधिकची ऊस बिले अदा करणेस त्याची मदत होऊ शकते.

त्याचप्रमाणे औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या साखरेचे दर व घरगुती वापरासाठी लागणाऱ्या साखरेचे दर वेगवेगळे ठेवण्याच्या धोरणाबाबत निर्णय शासनाने घेण्याची गरज आहे. ज्यामुळे साखर कारखानदारी टिकेल व ऊस उत्पादकांना ऊस बिले देण्यात अडचण येणार नाही.

सध्या साखर उद्योग अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. साखरेला बाजार भाव नाही. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात साखर विक्री करावी लागत आहे. उपपदार्थांचे दर अत्यंत कमी झालेले आहेत. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून निर्यात होणाऱ्या विजेची बिले वेळेवर मिळत नाहीत. अशाही परिस्थितीमध्ये कारखान्याने सर्व प्रकारची पेमेंट वेळेवर देण्याचा प्रयत्न सुरु ठेवलेला आहे. जुन्नर/आंबेगाव तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादक, कामगार, ऊस तोडणी कामगारांचे कारखान्यावर असणारे प्रेम यापुढेही राहील, असा विश्वास यावेळी सत्यशिल शेरकर यांनी व्यक्त केला. सोबत : फोटो शेरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com