"पेटीएम' मधूनही पैसे लंपास झाल्याने "कॅश'लेस

अनिल सावळे
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पुणे - डेबिट, क्रेडिट कार्डचा पासवर्ड मिळवून पैसे चोरी करण्याच्या घटना नव्या राहिल्या नाहीत. नोटबंदीच्या निर्णयानंतर नागरिक "कॅशलेस' व्यवहाराकडे वळत असताना आता "पेटीएम' सारख्या वॉलेटमधूनही पैसे लंपास होत आहेत. अशा प्रकारच्या सात-आठ तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र, अशा घटनांमुळे काही जणांवर खरोखरच "कॅश'लेस होण्याची वेळ ओढवली आहे.

पुणे - डेबिट, क्रेडिट कार्डचा पासवर्ड मिळवून पैसे चोरी करण्याच्या घटना नव्या राहिल्या नाहीत. नोटबंदीच्या निर्णयानंतर नागरिक "कॅशलेस' व्यवहाराकडे वळत असताना आता "पेटीएम' सारख्या वॉलेटमधूनही पैसे लंपास होत आहेत. अशा प्रकारच्या सात-आठ तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र, अशा घटनांमुळे काही जणांवर खरोखरच "कॅश'लेस होण्याची वेळ ओढवली आहे.

अमुक बॅंकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून एखाद्या व्यक्‍तीस डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरील क्रमांक विचारायचा. त्या व्यक्‍तीने क्रमांक सांगितला की, काही वेळातच ऑनलाइन बॅंकिंगद्वारे त्यांच्या बॅंक खात्यातून पैसे गायब. असा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. पोलिस आणि प्रसारमाध्यमातून जनजागृती केली जात असली, तरी अशा प्रकारच्या घटना सुरूच आहेत. त्यात केंद्र सरकारने नुकताच एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णय घेतला. या निर्णयानंतर नागरिक "कॅशलेस'च्या दिशेने जाताना सायबर चोरट्यांनीही आता नवी शक्‍कल लढविली आहे. शहरात "पेटीएम' मधून पैसे काढून फसवूणक केल्याच्या सात-आठ घटना घडल्या आहेत.
शहरातील सैफुद्दीन मनसुबदार, तन्वीर सय्यद, फुरसुंगी येथील गजानन जगताप, बाबासाहेब भंडारी तसेच हडपसर येथील मोहन कुमार यांच्यासह सात-आठ जणांनी त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार सायबर गुन्हे शाखेकडे केली आहे.

अशी होते फसवणूक
"पेटीएम'मधून रक्‍कम ट्रान्सफर झाली नाही किंवा काही तक्रार असल्यास नागरिक ऑनलाइन तक्रार नोंदवितात. नेमकी ही बाब हेरून सायबर चोरट्यांनी "पेटीएम कस्टमर कम्प्लेंट' नावाचे बनावट संकेतस्थळ सुरू केले. तेथे नागरिकांनी ऑनलाइन तक्रार नोंदविल्यास "लगेच तक्रारीचे निवारण करू, आपला आयडी क्रमांक द्या', असे सांगितले जाते. आयडी सांगितला की "आपल्या मोबाईलवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) नंबर येईल, तो एसएमएस करा,' असे सांगितले जाते. तो एसएमएस केला की ऑनलाइन बॅंकिंगद्वारे वॉलेटमधून पैसे काढून घेतले जातात.

सायबर गुन्हे शाखेकडे "पेटीएम'पैसे लंपास झाल्याच्या आठ तक्रारी आल्या आहेत. त्यामागे बिहार आणि झारखंड येथील टोळी कार्यरत असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल.
- सुनील पवार, वरिष्ठ निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा

अशी घ्यावी खबरदारी
- ग्राहकांनी एचटीटीपीएसने सुरू झालेल्या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार करावी
- अनोळखी व्यक्‍तीस आयडी क्रमांक आणि ओटीपी क्रमांक सांगू नये
- "पेटीएम'च्या संकेतस्थळावर आणि अधिकृत कर्मचाऱ्यांशीच संपर्क साधावा

Web Title: paytm outset oneself to money