पुणे : जिल्ह्यातील पाझर तलाव, बंधारे दोन दशकात पहिल्यांदाच भरले तुडूंब  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागामार्फत (पुर्वाश्रमीचे लघु पाटबंधारे) जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यात येतात. यामध्ये गाव व पाझर तलाव, कोल्हापूरी बंधारे, वळण बंधारे आणि साठवण बंधारे आदींचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता शशिकांत औटी यांनी सांगितले.  

पुणे : शहर व जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे, गाव व पाझर तलाव, कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे, वळण बंधारे आणि साठवण बंधारे यांना मात्र खुप फायदा झाला आहे. गेल्या दोन दशकानंतर यंदा पहिल्यांदाच पावसाच्या पाण्याने हे सर्व प्रकल्प काठोकाठ भरून वाहू लागले आहेत. हे सर्व प्रकल्प आतापर्यंत दरवर्षी जिल्ह्यातील धरणांमधील अतिरिक्त पाण्याने भरावी लागत असत. यासाठी धरणांमधील अतिरिक्त पाणी कँनालमध्ये सोडण्यात येत असे आणि या कँनलच्या पाण्याने ती भरून घेतली जात असत. त्यानुसार यंदाही ती भरण्यास सुरूवात करण्यात आली होती. यापैकी काही तलाव भरून घेतल्यानंतर जोराचा पाऊस सुरु झाला. त्यामुळे हे सर्व प्रकल्प आता पुर्ण भरले गेल्याचे सिंचन भवनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.    

     दरम्यान, जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक तलावांचे खोलीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे या तलावांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. त्यामुळे या तलावांमधील एकूण पाणी साठवण क्षमतेची माहिती जमा करण्यात येत आहे.

 जिल्ह्यातील लघु प्रकल्प                
- एकूण पाझर तलाव ---६१६      
- गाव तलावांची संख्या ---१०४      
- कोल्हापूरी पद्बतीचे बंधारे (को. प. बंधारे) - ३२४    
- वळण बंधारे संख्या --- ७३५        
- एकूण साठवण बंधारे --- ३८९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Pazar Lake filled for the first time in two decades