"पुरुषोत्तम'मध्ये "पाझर'ची बाजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

पुणे : आपला नंबर येणार का? पहिले पारितोषिक कोणाला मिळणार? यामुळे क्षणाक्षणाला वाढत जाणारी धडधड...अन्‌ प्रथम पारितोषिक मिळालेल्या संघाने केलेला जल्लोष...यामुळे भरत नाट्यमंदिराचे वातावरण रोमांचक बनले होते. निमित्त होते, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निकालाचे.

पुणे : आपला नंबर येणार का? पहिले पारितोषिक कोणाला मिळणार? यामुळे क्षणाक्षणाला वाढत जाणारी धडधड...अन्‌ प्रथम पारितोषिक मिळालेल्या संघाने केलेला जल्लोष...यामुळे भरत नाट्यमंदिराचे वातावरण रोमांचक बनले होते. निमित्त होते, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निकालाचे.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या "पाझर' एकांकिकेला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक घोषित होताच नाट्यमंदिरात शिट्ट्यांचा आणि घोषणांचा आवाज घुमला. महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आठ ते अकरा डिसेंबरदरम्यान आयोजित पुरुषोत्तम करंडकच्या महाअंतिम फेरीचा निकाल रविवारी जाहीर झाला. वैयक्तिक अभिनय प्रकारात जॉर्ज सॅलिएस याला अभिनय नैपुण्य पुरस्कार-अभिनेता, तर केतकी कुलकर्णी हिला अभिनय नैपुण्य-अभिनेत्री पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शक पुरस्कार प्रवीण पाटेकर याला मिळाला. अभिनेता आदेश बांदेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. पत्रकार राजीव खांडेकर, स्पर्धेचे परीक्षक विनिता पिंपळखरे, किरण यज्ञोपवीत, निखिल आपटे हे उपस्थित होते.

या प्रसंगी बांदेकर म्हणाले, ""नाट्य क्षेत्रात भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. याची जाण विद्यार्थ्यांना आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांकडून त्यांनी चांगले काम करावे, अशी अपेक्षा केली जाते. विद्यार्थीही प्रामाणिकपणे काम करतात; मात्र चांगले काय हे कोणीही सांगत नाही. विद्यार्थ्यांना त्यासाठी सरावाच्या वेळीच मार्गदर्शन केले पाहिजे.''
स्पर्धेतील नाटकांबद्दल बोलताना पिंपळखरे म्हणाल्या, ""नाटकांमध्ये सतत नावीन्याचा शोध घेतला गेला पाहिजे. स्पर्धेची गणितं न मांडता, मनापासून, साधेपणाने मांडता येईल, असे विषय निवडावे.''

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे बालनाट्य करंडक
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये नाट्य संस्कार रुजावेत, विद्यार्थ्यांमधील गुणांना चालना मिळावी, यासाठी संस्थेतर्फे महाविद्यालयीन करंडक प्रमाणेच "भा. ल. बा. केळकर करंडक' बालनाट्य स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा नऊ ते अकरा जानेवारीदरम्यान होणार आहे.

Web Title: pazar tops purushottam