पिंपरीत साथीच्या आजाराचा "पूर' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

शहरात पूर परिस्थितीने पाणी व चिखल साठलेल्या भागात अकरा वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून सात हजार 675 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. वायसीएम रुग्णालयात पंधरा दिवसांत डेंगीच्या रुग्णांसह दोन दिवसांत अतितापाचे 37 रुग्ण आढळले आहेत. जवळपास पंधरा दिवसांत 250 रुग्णांच्या तापाच्या तपासण्या केल्या असून, डेंगीचे चाळीस रुग्ण सकारात्मक आढळले आहेत. यातील दहा अतिगंभीर रुग्ण आहेत, तर मलेरियाचेदेखील दहाच्या आसपास रुग्ण दोन दिवसांत आढळले आहेत

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पाऊस आणि पुराच्या पाण्याने ग्रासलेले पिंपरी-चिंचवडकर आता साथीच्या आजाराने ग्रासले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर शहरातील नदीकाठच्या भागात डेंगी तापाने डोके वर काढले आहे. शहरातील पूरग्रस्त भागांत महापालिका आरोग्य विभागाने भेटी दिले असता 13 गावांत 482 रुग्ण साथीच्या आजाराने आजारी आहेत. रुग्णालयाच्या तपासणीत पंधरा दिवसांत जवळपास डेंगीचे चाळीस रुग्ण आढळले आहेत.
 
शहरात पूर परिस्थितीने पाणी व चिखल साठलेल्या भागात अकरा वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून सात हजार 675 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. वायसीएम रुग्णालयात पंधरा दिवसांत डेंगीच्या रुग्णांसह दोन दिवसांत अतितापाचे 37 रुग्ण आढळले आहेत. जवळपास पंधरा दिवसांत 250 रुग्णांच्या तापाच्या तपासण्या केल्या असून, डेंगीचे चाळीस रुग्ण सकारात्मक आढळले आहेत. यातील दहा अतिगंभीर रुग्ण आहेत, तर मलेरियाचेदेखील दहाच्या आसपास रुग्ण दोन दिवसांत आढळले आहेत. यात पेशींची संख्या कमी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. जलजन्य व कीटकजन्य साथीच्या आजारांत गॅस्ट्रो, कॉलरा, डायरिया, विषमज्वर, चिकुनगुणिया, कावीळ, पोटाचा संसर्ग रुग्णांमध्ये या आजारांचे प्रमाणही काही अंशी आढळले आहे. रुग्णांची तपासणी करून त्या ठिकाणी सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. घरातील पिण्याच्या व वापरावयाच्या पाण्याची तपासणी करून शहरातील तेरा विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. 

बारा ऑगस्टपर्यंत वायसीएममध्ये बाह्यरुग्ण विभागात एक हजार 226 रुग्ण दाखल झाले आहेत. आंतररुग्ण विभागात 669 रुग्ण दाखल झाले आहेत. सर्वांत जास्त औषध विभागात मागणी वाढली आहे. 

औषध : 351 
बालरोग : 76 
ऑर्थोपेडिक : 115 
त्वचेसाठी : 93 
कान, नाक, घसा : 76 
जुलाब : 35
अतिसार : 53 
ताप : 394 

लॅप्टोस्पायरिसिसची धोक्‍याची घंटा 
पुराच्या पाण्यामुळे सखल भागात साठलेल्या पाण्याने लॅप्टोस्पायरोसिस होण्याचा जास्त धोका आहे. यात प्राथमिक दक्षता घेणे गरजेचे आहे. पायाला चीर अथवा जखम आढळल्यास त्वरित दवाखान्यात संपर्क साधावा. अद्याप पुराच्या भागातील पाणी दूषित असण्याची शक्‍यता असल्याने पाणी उकळून पिणे आवश्‍यक आहे. सर्दी, ताप, खोकला झाल्यास तसेच अंगदुखी, जळजळ, ताप, डोकेदुखी वाटल्यास अंगावर न काढता तत्काळ दवाखान्यात जाणे गरजेचे आहे. पावसाळी चपला व बूट तसेच मास्क घालून काम करणे गरजेचे आहे. पाण्यात व चिखलात लेप्टोचे जंतू दीर्घकाळ जिवंत राहतात. लेप्टोस्पायरोसिस झाल्यास लवकर निदान होत नाही. चिखलातून या आजाराचा जास्त संसर्ग पसरतो. लघवी तपासणी केल्यास याचे निदान समजते. तेव्हा जीव वाचण्याची शक्‍यता असते, असे वरिष्ठ डॉ. विनायक पाटील यांनी सांगितले आहे. 

""पुराच्या पाण्यामुळे साथीच्या आजारात वाढ झाली आहे. दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण दाखल होत असत तो आकडा आता तीनशेपर्यंत पोचला आहे. सध्या रुग्णालयावर ताण आला आहे. त्यामुळे डॉक्‍टरांची संख्या वाढली असली, तरी शिकाऊ डॉक्‍टरांवर अवलंबून राहता येणार नाही. यासाठी अजून यंत्रणा हवी. औषधांचे टेंडर आता लवकर निघेल; प्रक्रिया पूर्ण झाली आहे.'' 
- राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pcmc area viral flue