सावळ्यागोंधळातच पिंपरी पोलिस आयुक्तालयाची वर्षपूर्ती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 पासून स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाले. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हद्दीतील पंधरा पोलिस ठाण्यांचा यामध्ये समावेश आहे. सुरवातीला चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर येथून कामकाजाला सुरवात झाली.

पिंपरी : "आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे', अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात स्वतंत्र आयुक्तालय स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाचा अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींचा पोलिसांना सामना करावा लागला. सुविधांची जुळवाजुळव, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, विभागांच्या जागांचे नियोजन अशा सावळ्यागोंधळात वर्ष निघून गेले. कार्यालयीन विस्कळितपणामुळे अद्याप विविध स्वतंत्र पथके कार्यान्वित होऊ शकली नाहीत. स्वतंत्र आयुक्तालयाच्या दृष्टीने अनेक गोष्टींची कमतरता असल्याचे दिसून येते. 

प्रशस्त इमारतीची प्रतीक्षाच 
शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 पासून स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाले. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हद्दीतील पंधरा पोलिस ठाण्यांचा यामध्ये समावेश आहे. सुरवातीला चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर येथून कामकाजाला सुरवात झाली. येथील जागा अपुरी असल्याने अधिकाऱ्यांची कार्यालयेही छोटी होती. दरम्यान, नऊ जानेवारी 2019 रोजी चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळेत आयुक्तालय स्थलांतरित झाले. मात्र, ही जागा कामकाजासाठी अपुरी पडत आहे. दरम्यान, आयुक्तालयासाठी प्रशस्त इमारतीसह मुख्यालयासाठीही प्रशस्त मैदानाची आवश्‍यकता आहे. 

केवळ स्थापना, सुविधांचे काम 
राजकीय नेत्यांच्या श्रेयवादातून आयुक्तालय स्थापनेचा तातडीने घाट घातला गेला. मात्र, स्थापनेपूर्वी आयुक्तालयासाठी प्रशस्त जागा, अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक, सरकारी निधी, इतर सोईसुविधा याबाबतचे नियोजन अगोदरच होणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. आयुक्तालयासाठी सरकारने केलेल्या तरतुदी अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे केवळ आयुक्तालय स्थापन झाले. मात्र, त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या सोईसुविधांसाठी झगडावे लागत आहे. 

पगार वेळेवर नाहीत
पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिस दल मिळून आयुक्तालय स्थापन झाले. यासह इतर जिल्ह्यातीलही कर्मचाऱ्यांचा समावेश झाला. मात्र, कर्मचाऱ्यांच्या पगाराला अनेकदा विलंब होतो. "डिटॅच-ऍटॅच' प्रक्रियेमुळे वेळेत पगार होत नाहीत. शाळा प्रवेश, लग्नसराई असलेल्या मे, जून महिन्यात पगाराला उशीर झाला. यामुळे काही कर्मचाऱ्यांवर उसने पैसे घेण्याची वेळ आली. सध्याच्या ऑगस्ट महिन्याचा अद्यापही पगार झालेला नाही. 

वाहनांचा अभाव 
कॉल आला की तातडीने घटनास्थळी पोचावे लागते. मात्र, वेळेत न पोचल्यास जादा कवायतीची शिक्षा दिली जाते. मात्र, या "रिस्पॉन्स टीम'ला वाहनांसारख्या सुविधाच नसल्याने वेळेत पोचणे शक्‍य होत नाही. सध्या प्रत्येक पोलिस ठाण्यात एक अथवा दोनच सरकारी चारचाकी वाहने आहेत. या दोन वाहनांपैकी एक वाहन वरिष्ठ निरीक्षकासाठी तर दुसरे वाहन आरोपीला न्यायालयात नेण्यासाठी अथवा इतर कामकाजासाठी असते. दरम्यान, "रिस्पॉन्स टीम'ला एखादा कॉल आल्यास त्यांना वेळेत पोचणे शक्‍य होत नाही. अशातच वाहन उपलब्धतेअभावी घटनास्थळी पोचण्यास उशीर झाल्यास त्याचा ठपका पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवरच ठेवला जातो. त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागते. दरम्यान, प्रत्येक ठाण्यांना किमान तीन वाहनांची तरी आवश्‍यकता आहे. 

बदल्यांचे सत्र 
आयुक्तालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. वर्षभरात एकाच अधिकाऱ्याची पाच ते सहा वेळा बदली झाली आहे. यामुळे कामकाजातही विस्कळितपणा येत असल्याचे दिसून येते. यासह आयुक्तालयासाठी श्‍वान पथक, ठसे तज्ज्ञ, शस्त्रागार, क्विक रिस्पॉन्स टीम या पथकांची आवश्‍यकता आहे. मात्र, पथकासही अद्याप मुहूर्त लागलेला नाही. 

तपासाला वेग 
तक्रारदाराची पोलिस ठाण्यात दखल न घेतल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाण्यासाठी ते सहज उपलब्ध होत नव्हते. मात्र, आयुक्तालय स्थापन झाल्यापासून तक्रारदार थेट चिंचवड येथील आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जात आहे. अनेकांचे ठाण्यांमध्ये न सुटणारे प्रश्‍न आयुक्तालयात आल्यावर मार्गी लागले आहेत. 

गुन्हा दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ 
आयुक्तालय झाल्यापासून एखादी छोटी घटना असली तरी त्याची तातडीने दखल घेतली जात असून, गुन्हाही दाखल होत आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात बारा हजार 72 गुन्ह्यांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. यासह तपासाला वेग दिला जात असून, सायबर सेल, इंडस्ट्रिअल सेल, क्राईम युनिट, स्वतंत्र वाहतूक विभाग, महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. 

89 जण तडीपार 
वर्षभरात आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध दहा ठाण्यांमधून 89 जणांवर तडीपारची कारवाई करण्यात आली. यामध्ये पिंपरी 19, चिंचवड 11, भोसरी 1, एमआयडीसी भोसरी 12, चाकण 7, निगडी 8, वाकड 17, सांगवी 6, हिंजवडी 1, दिघी 7 यांचा समावेश आहे. 

वर्षभरात घडलेले गंभीर गुन्हे 
खून : 69 
खुनाचा प्रयत्न :86 
बलात्कार : 118 
दरोडा : 32 
जबरी चोरी : 357 
विनयभंग : 469 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pcmc commissioner office compliting one year