काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांचे राजीनामा प्रकरण तापले असून, पक्षांतर्गत वाद पुन्हा उफाळला आहे. शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची आज मुंबईत भेट घेऊन साठे यांनी दिलेला शहराध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली. त्याबाबत एक लेखी निवेदनही चव्हाण यांना देण्यात आले. चव्हाण यांनी साठेंचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळलेला नाही आणि स्वीकारलाही नाही, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांचे राजीनामा प्रकरण तापले असून, पक्षांतर्गत वाद पुन्हा उफाळला आहे. शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची आज मुंबईत भेट घेऊन साठे यांनी दिलेला शहराध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली. त्याबाबत एक लेखी निवेदनही चव्हाण यांना देण्यात आले. चव्हाण यांनी साठेंचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळलेला नाही आणि स्वीकारलाही नाही, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. पक्षाच्या फेरबांधणीसाठी सर्वांशी चर्चा करून या राजीनाम्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. यापूर्वी महापालिका सभागृहात काँग्रेसचे १४ नगरसेवक होते. या वेळी साठे यांच्यासह काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या बहुतांश उमेदवारांची अनामत जप्त झाली. पराभवाची जबाबदारी स्वीकारून सचिन साठे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला; परंतु अवघ्या काही दिवसांतच वरिष्ठांनी हा राजीनामा फेटाळल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. राजीनामा स्वीकारावा, अशी बहुतांशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. याच मुद्यावरून काँग्रेसमध्ये वाद उफाळला आहे.

पक्षातील जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांपैकी अशोक मोरे, निगार बारस्कर यांच्यासह वीस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यापर्यंत पिच्छा पुरवून साठे यांचा राजीनामा खरोखरच फेटाळण्यात आला आहे का, याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. या पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांची भेट घेऊन साठे यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी मागणी केली. साठे यांचा राजीनामा फेटाळल्याचे वृत्त खरे आहे का, अशीही प्रदेशाध्यक्षांना विचारणा केली. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी साठे यांचा राजीनामा फेटाळला नाही आणि स्वीकारलेलाही नाही, असे स्पष्ट केल्याचे मोरे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. या वेळी या पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांना निवेदन देऊन साठे यांच्या अपयशाचा पाढाच वाचला. महापालिकेच्या १२८ जागांसाठी काँग्रेसचे २५० जण इच्छुक असताना केवळ ७० उमेदवार जाहीर करण्यात आले. त्या सर्वांचा निवडणुकीत पराभव झाला. त्याला सर्वस्वी शहराध्यक्ष साठे जबाबदार आहेत. 

साठे यांनी आपल्या शहराध्यक्षपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात पक्षाची संपूर्ण कार्यकारिणीही निवडता आली नाही. साठे यांनी जनसमुदाय नसलेल्या आणि कोणतीही निवडणूक लढविण्याचा अनुभव नसलेल्या पक्षातील मंडळींना हाताशी धरल्याने पक्ष तळागाळापर्यंत पोचू शकला नाही. निवडणुकीत साठे हे स्वतः उमेदवार होते. त्यामुळे ते कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराला जाऊ शकले नाहीत.

Web Title: pcmc congress internal politics