काँग्रेस बचावासाठी शहराध्यक्ष हटाव मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने अस्तित्व हरवलेल्या काँग्रेसच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता ‘काँग्रेस बचाव’ची घोषणा करत शहराध्यक्ष सचिन साठे यांना हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही, याची जबाबदारी स्वीकारून साठे यांनी पदाचा दिलेला राजीनामा त्वरित मंजूर करून निष्ठावान कार्यकर्त्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काँग्रेस राष्ट्रीय समितीच्या सदस्या निगार बारस्कर यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. अध्यस्थानी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे होते. माजी नगरसेवक रामचंद्र माने, प्रदीप पवार, सचिन कोंढरे, दिलीप पांढरकर, उमेश बनसोडे, निखिल भोईर, एस. टी. कांबळे, दिगंबर भालेराव, बाळू जगताप, अर्चना मिश्रा, राजन पिल्ले, मंगला मोहिते, मयूर काळभोर, सुनील डोईजड, दीपक जगताप, कमल श्रोत्री आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. शहरात काँग्रेस मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याची शपथ घेतली. 

प्रदेशाध्यक्षांना शिष्टमंडळ भेटणार
काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी (ता.१७) प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेणार आहेत. निवडणुकीत झालेल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जाणार आहेत. सचिन साठे यांनी शहराध्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी राजीनामा मंजूर करू नये, अशी मागणी नेत्यांकडे केली होती. प्रदेशाध्यक्षांनीही त्यांचा राजीनामा फेटाळला होता.  मात्र शहराध्यक्षांनी दिलेला राजीनामा मंजूर करून निष्ठावान कार्यकर्त्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्याची मागणी करण्यात येणार आहे.

मी दिलेला राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फेटाळून माझ्यावर विश्‍वास व्यक्त केला आहे. आता त्यांनीच निर्णय घेतला असल्याने, अशा बैठका घेणे योग्य नव्हे. मला या बाबतीत प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही.
- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Pcmc congress President dislocation campaign