वीजचोरांवर महावितरणची मेहेरबानी

अविनाश चिलेकर
शनिवार, 12 मे 2018

दोन दिवसांपूर्वी आकुर्डी, प्राधिकरण परिसरात विजेचा खेळखंडोबा झाला. तब्बल सहा-सात तास वीज गेली होती. कडाक्‍याच्या उन्हाळ्यात अंगातून घामाच्या धारा वाहत असताना वीज गेल्यावर काय हाल होतात ते लोकांनी अनुभवले. परीक्षा सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. चिखली, तळवडे परिसरातील लघुउद्योजकांचेही नुकसान झाले. 

दोन दिवसांपूर्वी आकुर्डी, प्राधिकरण परिसरात विजेचा खेळखंडोबा झाला. तब्बल सहा-सात तास वीज गेली होती. कडाक्‍याच्या उन्हाळ्यात अंगातून घामाच्या धारा वाहत असताना वीज गेल्यावर काय हाल होतात ते लोकांनी अनुभवले. परीक्षा सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. चिखली, तळवडे परिसरातील लघुउद्योजकांचेही नुकसान झाले. 

पिंपरी परिसरातसुद्धा हा अनुभव वारंवार येतो. भोसरी, पिंपरी बाजारपेठ, भाटनगर, बहुतांशी झोपडपट्यांतून राजरोसपणे वीजचोरी होते. रात्रीच्या सुमारास टपऱ्या, हातगाड्यांमध्ये चोरून वीजवापर होतो. थेट महावितरणच्या डीपी बॉक्‍समधून अथवा खांबावरून आकडे टाकून वीज घेतली जाते. अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहीत असूनही ते डोळेझाक करतात. कारण हप्तेबंदी. गुरुवारची (ता.१०) घटना अत्यंत बोलकी आणि महावितरणच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. महावितरणच्या सहायक अभियंत्याला १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. एकूणच काय तर महावितरणमध्ये किती अंदाधुंदी माजली आहे, त्याचे हे दाखले. 

वीज चोरी हा अत्यंत गंभीर विषय. मात्र, अधिकारी कर्मचारी तिकडे जराही लक्ष देत नाहीत. काही अधिकाऱ्यांना महिन्याची मोठी बिदागी मिळते म्हणून चोऱ्यांकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात, असाही आक्षेप आहे. महावितरणच्या भ्रष्ट कारभाराला शहरातील तमाम उद्योजक जाम वैतागलेले आहेत. कुठेतरी कठोर कारवाईची आणि प्रशासनात दुरुस्तीची नितांत गरज आहे.  

दलाली, वीज चोरी बंद करा  
२२ लाखांच्या या शहरात किमान पाच लाख कुटुंबे आहेत. त्यात निवासी, व्यापारी औद्योगिक अशी विभागणी केली, तर एकही ग्राहक महावितरणबाबत समाधानी नाही. महापालिका आणि महावितरण मिळून अर्ध्या-अर्ध्या खर्चात सर्व वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे ठरले होते. महावितरणची वाट न पाहता महापालिकेने स्वखर्चाने हे काम केले. पैसे द्यायची वेळ आली त्या वेळी महावितरणने हात वर केले. वीजवाहिन्या भूमिगत केल्यावर पावसाळ्यात वीज खंडित होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात गेल्या दोन-चार पावसाळ्यातील अनुभव वाईट आहे. पावसाळ्यात वादळवाऱ्याने वीज जाते, उन्हाळ्यात अतिवापर होतो म्हणून वीज गुल होते. पाच वर्षांपूर्वी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चून दुरुस्ती झाली, पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पिंपरी बाजारपेठेत सर्व दुकानांतून विजेचा झगमगाट असतो. मंडईतील सर्व गाळे, भाटनगर परिसरात वीज चोरी कुठे कशी चालते, हे अधिकारी पाहतात. शहरातील रोजच्या वीज चोरीचा आकडा कितीतरी लाखावर जाईल. दुसरीकडे एखाद्या सामान्य ग्राहकाचे महिन्याचे बिल थकले तरी वीज तोडण्याची कारवाई होते. अवास्तव आणि चुकीच्या वीज बिलांचे वाटप ही नेहमीची तक्रार आहे. 

या भोंगळ कारभाराविरुद्ध थेरगाव, वाकड परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढण्याची तयारी केली होती. एकही काम पैसे दिल्याघेतल्याशिवाय होत नाही, हे वास्तव आहे. महावितरणच्या कार्यालयांतून असंख्य दलाल सक्रिय आहेत. ‘लाच देऊ नका घेऊ नका’ असा नुसता फलक लावून कारभारात सुधारणा होणार नाही. त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. ग्राहकांना तक्रारच करता येऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळी फोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला जातो. सौजन्याची वागणूक तर दूरच. कर्मचारी-अधिकारी ही परिस्थिती सुधारू शकतात. वीजचोरांवर फौजदारी दाखल करा, अर्धे काम फत्ते होईल.

Web Title: PCMc electricity theft issue