‘अग्निशामक’वर पावसाची ‘कृपा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

यंदा पावसाने फटाके विक्रेत्यांच्या व्यवसायाला फटका बसला. मात्र, त्याचबरोबरच फटाक्‍यांची विक्री कमी होऊन आगी लागण्याचे मोठे प्रकार घडले नाहीत.   

पिंपरी -  दिवाळीत पावसाने थैमान घातल्याने सर्व व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण राहिले. मात्र, त्याच पावसाचा महापालिकेच्या अग्निशामक दलावर आशीर्वाद राहिला. त्याच्या कृपेमुळे शहरातील फटाक्‍यांच्या विक्रीत घट होऊन पिंपरीतील दुर्घटना वगळता आगी लागण्याच्या प्रकारात मोठी घट झाली.

दरवर्षी दिवाळीपूर्वी शहर परिसरात अनेक ठिकाणी फटाके विक्रेते दुकाने थाटत असतात. नवनवीन कपडे, दागदागिने यांसारख्या गोष्टींबरोबरच फटाक्‍यांनाही लोकांची मागणी असते. मात्र, फटाक्‍यांमुळे शहर परिसरात आगी लागण्याचे कमी-अधिक प्रकार घडत असतात. यंदा पावसाने फटाके विक्रेत्यांच्या व्यवसायाला फटका बसला. मात्र, त्याचबरोबरच फटाक्‍यांची विक्री कमी होऊन आगी लागण्याचे मोठे प्रकार घडले नाहीत.   

पालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे म्हणाले, ‘‘यंदाच्या दिवाळीत पिंपरीतील गोकूळ हॉटेलसमोरील आग वगळता आगीच्या किरकोळ आणि नगण्य दुर्घटना घडल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आग लागण्याच्या तीन तर पाडवा-नरक चतुर्दशीच्या दिवशी दलाला आग लागल्याच्या दोन ते तीन वर्दी मिळाल्या. यंदा फटाके विक्रेत्यांना त्यांच्या दुकानांत विशेष अग्निशमन यंत्र बसविण्याचे बंधन घातले गेल्याने आणि पावसामुळेही फटाक्‍यांची कमी विक्री झाल्याने आगी लागण्याच्या प्रमाणात घट झाली.’’

पावसामुळे फटाके विक्रेत्यांच्या संख्येतही घट झाली. या वेळी फटाक्‍यांच्या दुकानांसाठी ७५ अर्जदार राहिले. दिवाळी नव्हे तर वर्षभर चिखली-कुदळवाडीत अधूनमधून आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. हेच प्रमाण  दिवाळीत शून्यावर आले. चिखली पोलिस ठाण्याच्या आवारातच खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाची गाडी ठेवण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या गस्तही घालत होत्या. त्यामुळे तेथील आगीच्या घटना कमी झाल्या.

मागील वर्षी आगीच्या आठ वर्दी 
मागील वर्षी दिवाळी नोव्हेंबर महिन्यात साजरी झाली. त्यात पाच रेस्क्‍यू कॉल होते, तर आठ ठिकाणी आग लागल्याच्या वर्दी अग्निशमन दलाला मिळाल्या. मात्र, यंदा फटाक्‍यांमुळे आग लागल्याचे प्रकार नगण्य होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCMC firebridge