चिंचवड मतदारसंघाला महापौरपदाची संधी?

pcmc
pcmc

पिंपरी - शहराचे महापौरपद सर्वसाधारण गटातील (खुला) महिलेसाठी आरक्षित झाले. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या खुल्या गटातील २१ महिला निवडून आल्या आहेत. त्यापैकी कोणाला संधी मिळणार, कोणत्या विधानसभा मतदारसंघातील नगरसेविकेची निवड होणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

सत्ताधारी भाजपचे ७७ सदस्य महापालिकेत आहेत. त्यात ३९ नगरसेविका आहेत. त्यातील खुल्या गटातून निवडून आलेल्या २१ महिला आहेत. विद्यमान महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाळ २१ सप्टेंबरला संपुष्टात आला होता. मात्र, विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ही मुदत २१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी महापौरपदाची सोडत काढणे आवश्‍यक होते. त्यानुसार बुधवारी (ता. १३) मुंबईत सोडत काढण्यात आली. त्यात महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आरक्षित झाले.

भाजपकडून खुल्या गटातून निवडून आलेल्या नगरसेविकांपैकी उपमहापौरपदासह विषय समित्या व प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची संधी काही महिलांना मिळाली आहे. त्यामुळे महापौरपदाची संधी त्यांना मिळणार की अन्य नगरसेविकांची निवड होणार याबाबत उत्सुकता आहे. 

दोन महिलांना संधी
भाजपने यापूर्वी दोन नगरसेवकांना महापौरपदाची संधी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात दोन नगरसेविकांना महापौर पदावर संधी मिळू शकते. कारण, सव्वा दोन वर्षांनी अर्थात फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे. हा कालावधी लक्षात घेतल्यास सव्वा वर्ष आणि एक वर्ष अशा कालावधीत दोन नगरसेविकांना महापौरपदाची संधी मिळू शकते. 

भोसरी की चिंचवड?
महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाल्यानंतर भाजपची एक हाती सत्ता आली. त्या वेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे समर्थक चऱ्होलीचे नगरसेवक नितीन काळजे यांना संधी देण्यात आली. त्यांचा सव्वा वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर लांडगे यांचेच समर्थक चिखली- जाधववाडीतील राहुल जाधव यांना महापौरपदाची संधी देण्यात आली. आता त्यांच्या नंतर कोणत्या मतदारसंघातील नगरसेवकाला संधी मिळते, याची चर्चा सुरू झाली आहे. भोसरीतून सहा, पिंपरीतून चार आणि चिंचवडमधून ११ नगरसेविका खुल्या गटातील आहेत. त्यामुळे आता चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

यापूर्वीच्या महिला महापौर
शहराचे महापौरपद यापूर्वी अनिता फरांदे (मार्च१९९७ ते मार्च १९९८), मंगला कदम (फेब्रुवारी २००५ ते मार्च २००७), डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे (मार्च २००७ ते मे २००८), अपर्णा डोके (जून २००८ ते नोव्हेंबर २००९), मोहिनी लांडे (मार्च २०१२ ते सप्टेंबर २०१४) आणि शकुंतला धराडे (सप्टेंबर २०१४ ते मार्च २०१७) यांनी भूषविले आहे.

अडीच वर्षांनी पुन्हा महिला
महापालिकेत भाजपची सत्ता येण्यापूर्वी २०१२ ते २०१७ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्या वेळी अडीच-अडीच वर्षांची विभागणी करून राष्ट्रवादीच्या दोन महिलांना महापौरपदाची संधी मिळाली होती. आता अडीच वर्षांच्या कालावधीनंतर शहराला पुन्हा महिला महापौर मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या काळात भोसरीच्या मोहिनी लांडे आणि पिंपळे गुरवच्या शकुंतला धराडे महापौर झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com